काँग्रेसकडून महिलांसाठी पाच गॅरंटी योजना जाहिर

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ घोषणा केल्या असून यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी जाहीर केले.

भारत जोडो न्याय यात्रेच्या महिला हक्क न्याय परिषदेला ॲानलाईन संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महालक्ष्मी गॅरंटी अंतर्गत देशातील सर्व गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, अंतर्गत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के हिस्सा महिलांना दिला जाईल. शक्ती का सम्मान, अंतर्गत आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्न भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे वेतनात केंद्र सरकारचा हिस्सा दुप्पट केला जाईल. अधिकार मैत्री, अंतर्गत महिलांना त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सावित्रिबाई फुले वसतिगृह अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह बांधले जाईल. याआधी काँग्रेस पक्षाने शेतकरी न्याय, युवा न्याय व भागिदारी न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी पोकळ वा जुमले नसतात तर त्या काळ्या दगडावरील रेघ असतात. आमच्या विरोधकांचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा १९२६ पासून जाहिरनामे बनवतो व त्यातील घोषणा पूर्णही करतो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत आमचे हात बळकट करा, असे आवाहनही केले.

महिला हक्क न्याय परिषदेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुमधडाक्यात महिला आरक्षण जाहीर केले, जल्लोषही केला परंतु हे आरक्षण सर्वे केल्यानंतर लागू होईल म्हणजे १० वर्षानंतर परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल. विधानसभा, लोकसभेसह सर्व ठिकाणी महिलांची भागिदारी वाढली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. महालक्ष्मी योजनेचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. नरेंद्र मोदी देशातील अरबपतींना १६ लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष महिलांना मदत करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. महिला न्याय गॅरंटी हे देशाच्या इतिहासात क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्वे करुन प्रत्येक विभागात महिला, दलित, अल्पसंख्याक, मागास समाजाची किती भागिदारी आहे हे तपासणार आहे. काँग्रेसने हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांती करुन इतिहास घडवला आणि आता जातनिहाय जनगणना करून जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी हे सुत्र आमलात आणणार आहे. युपीए सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस सिलिंडर नरेंद्र मोदींना महाग वाटत होता पण त्यांच्या सरकारने तो ९०० रुपये केला तरीही त्यांना तो महाग वाटत नाही. हिंदुस्थानचे सरकार ९० लोक चालवतात त्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास समाजाचे लोक अत्यल्प आहेत. सर्व क्षेत्रात या समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी आहे आणि हेच चित्र काँग्रेस पक्षाला बदलवायचे असून ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा भागिदारी हे सुत्र लागू करायचे आहे असे सांगितले.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यावेळी बोलताना म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने महिलांसाठी नेहमीच काम केले आहे. मॅटरनिटी लिव्ह, हुंडाविरोधी कायदा, कन्या भृण हत्या विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधातील कायदा असे अनेक कायदे करुन महिला सक्षमिकरणाची पावले उचलली आहेत. महिला सक्षमीकरण करुन त्यांना त्यांचे हक्क देण्याचे काम काँग्रेस करत आहे. आज जाहीर केलेल्या महिला न्याय गॅरंटीचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार असून अलका लांबा यांनी महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

या महिला हक्क न्याय हक्क परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव सोनल पटेल, हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार शिरिष चौधरी, आमदार अमित झनक, भावना जैन, धुळे काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.

सकाळी दोंडाईचा पासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली त्यांनतर धुळ्यातील क्रांती स्मारकाला भेट देऊन राहुल गांधी यांनी अभिवादन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित केले दुपारनंतर यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला, मालेगाव येथे जाहीर सभा आणि हॉटेल फाऊंटन मालेगाव येथे यात्रेचा मुक्काम असेल.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *