राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी ५८ हजार ६३२ मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत ३१ मे २०२६ पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत २९ मे २०२६ पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत ५८ हजार ६३२ मेट्रिक टन उद्दिष्ट वाढवून दिले, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी ९० दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी ६० दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकऱ्यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिली.
जयकुमार रावल पुढे बोलताना म्हणाले की, किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात झाली असून, १ मे पर्यंतचा कालावधी आता ३१ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. खरीप हंगाम २०२५-२६ साठी राज्याला ३ लाख ३७ हजार मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत ३७ हजार ८०१ शेतकऱ्यांकडून ६ लाख ८२ हजार ३७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.
पुढे बोलताना जयकुमार रावल म्हणाले की, हरभरा खरेदीला १ मार्च २०२६ पासून सुरुवात झाली होती. आधी २९ एप्रिलपर्यंत असलेली मुदत आता २९ मे २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. हरभरा खरेदीसाठी सुरुवातीला ७ लाख ६१ हजार २५० मेट्रिक टन उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात आणखी ५८ हजार ६३२ मेट्रिक टन वाढ करून एकूण उद्दिष्ट ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख ७ हजार ९७३ शेतकऱ्यांकडून ७६ लाख १२ हजार ४९९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी दिली.
तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने तूर व हरभरा खरेदीसाठी नवीन तसेच एकदा वापरलेल्या लहान B-Twill ज्यूट पिशव्यांच्या वापरासही परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
शेवटी बोलताना जयकुमार रावल म्हणाले की, राज्यात खरेदी संस्थांच्या माध्यमातून तूर व हरभरा खरेदी पूर्ण पारदर्शकपणे सुरू असून शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya