Breaking News

बदलापूर प्रकरणी काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स

महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त सवाल करत या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने या नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला.

बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार अस्लम शेख, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे. या वकिलाने निवडणूक लढविली असून उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. सरकार म्हणते विरोधक राजकारण करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का सरकार म्हणून? कोलकता इथे अत्याचाराच्या घटना झाल्यावर भाजपा आंदोलन करते तेव्हा राजकारण नसते का? आम्ही आंदोलन केले की राजकारण होते का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ५७% टक्के गुन्ह्यात वाढ झाली आहे. पण मुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचा आरोपही यावेळी केला.

पीडितेच्या गर्भवती आईला ११ तास पोलीस स्टेशनमध्ये थांबवणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा-वर्षा गायकवाड

बदलापूरमधील दोन शाळकरी चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राची मान देशात शरमेने खाली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच माता, भगिनी, चिमुकल्या व शाळेत मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. बदलापूरच्या आधी शिळ फाट्याच्या मंदिरात गृहिणीवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करुन हत्या केली. उरणमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली. बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला वाचवणारी शक्ती कोणती असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

ॉबदलापूर घटनेप्रकरणी काँग्रेसने मंत्रालयावर मोर्चा काढून सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी भाजपा युती सरकारवर तोफ डागत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दोन चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचाराचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. १३ तारखेला घटना घडली असताना शाळा प्रशासानाने त्याची दखल का घेतली नाही. पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीच्या गर्भवती आईला ११ तास ताटकळत का ठेवले, कोणाच्या दबावाखाली पोलीस काम करत होते. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत होता ह्याचा खुलासा झाला पाहिजे. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली तेव्हा सरकार जागे झाले व थातूरमातूर कारवाई केली. निलंबनाची कारवाई करुन चालणार नाही या प्रकरणी बदलापूर पोलीस स्टेशनमधील संबंधित वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. संबंधित शाळेला वाचवण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती असा सवाल करून शाळा व्यवस्थानावरही कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, सरकार दखल घेत नाही हे लक्षात आल्यानेच जनतेने आंदोलन केले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. केसेस टाकण्यात आले व ४० ते ५० लोकांना अटक करुन कोर्टात घेऊन गेले. हे पोलीस पीडितेची तक्रारही दाखल करुन घेत नव्हते. सरकारला मुली, महिला यांच्यावरील अत्याचार दिसत नाहीत पण न्याय मागण्यांवरच कारवाई केली जाते, हा कुठला न्याय असा सवालही यावेळी उपस्थित करत बदलापूरच्या पीडीत कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. महिलांची तक्रार घेऊन सरकारकडे न्याय मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, ‘हिट अँड रन’ प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलावर कारवाई का नाही? पोलिसांवर दबाव कोणाचा ? कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी भाजपाच्या दावणीला

भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार व त्यांच्या नातेवाईकांना कायद्याचा धाकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *