मुंबई : प्रतिनिधी
देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली.
मागील ५ वर्ष देशाच्या आर्थिक विकास दरात घट होत आली आहे. शिवाय नवीन मोजणी करताना सुमारे ३६ टक्के कंपन्या अस्तित्वातच नव्हत्या, हे वास्तव देखील समोर आलेले आहे. त्यामुळे यावर्षी नोंदवला गेलेला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ६.८ टक्के दर प्रत्यक्षात ४ टक्क्यांच्याही खाली असण्याची शक्यता आहे. प्रचंड बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्थेची दाहकता जनतेसमोर येऊ नये म्हणून सरकारकडून हे आकडे लपवण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे अतिशय गंभीर मुद्दे असून, ते अनुत्तरीत राहणे देशाला परवडणारे नाही. सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक युवकांची लोकसंख्या असलेल्या या देशात तरूणांच्या हाताला काम नसणे हे चित्र अत्यंत धोकादायक आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील दुसरे सरकार तरी या दोन्ही गंभीर प्रश्नांवर प्राधान्याने आणि युद्धपातळीवर काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कृषी क्षेत्र आणि लघु व मध्यम उद्योगांकडे दुर्लक्ष झाल्याने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यंदाच्या आकडेवारीतूनही तेच प्रतित होत आहे. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी कृषी क्षेत्र आणि लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाचे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील व केवळ निवडक उद्योजकांवर असलेला गेल्या पाच वर्षातील सरकारचा प्राधान्यक्रम लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांकडे वळवावा लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील गंभीर धोका लक्षात घेता नव्या केंद्र सरकारने आपल्या धोरणात व कारभारात बदल करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Marathi e-Batmya