देवेंद्र फडणवीस यांची टीका, विकास प्रकल्पांत अडथळे निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न डहाणू येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

विकसित, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि महायुती सरकार वेगाने पावले उचलत आहे. कोणालाही उध्वस्त करून विकास करणारे आमचे सरकार नाही तर सर्वांना सोबत घेऊन जाणारे आमचे सरकार आहे. विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक घटकाला सामावून घेत त्यांचे जीवन उंचावण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी ‘महायुती’ ला पुन्हा संधी द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

डहाणू येथे महायुती चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे विनोद मेढा यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, गुजरातचे आमदार अरविंद पटेल, भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, पालघरच्या प्रभारी राणी द्विवेदी, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, रिपाईं चे पालघर अध्यक्ष सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्हा निर्मिती नंतर जिल्हा विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने अनेक योजना आणल्या, गतीमान अंमलबाजावणीसाठी पावले उचलली. केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे पालघर जिल्हा हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाचे इंजिन बनत आहे. हे प्रयत्न करताना प्रत्येक मोठ्या प्रकल्पावेळी विरोधकांनी खोटा प्रचार करून स्थानिकांची दिशाभूल करत त्यात खोडा घातला. पण आम्ही थांबलो नाही. सातत्याने विकास कामे करत आहोत. येथील मच्छिमार बांधव असोत की आदिवासी बांधव असोत सर्वांना समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अथक काम करत आहे. जल, जमीन आणि जंगल चे रक्षण करण्याचा शब्द येथील आदिवासी बांधवांना देतो असे सांगत त्यांचे अधिकार शाबूत राहतील असे आश्वासनही यावेळी दिले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मच्छिमार बांधवांचे जीवन उंचावण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नील क्रांती योजना आणली, मासेमारीला शेती आणि उद्योगाचा दर्जा दिला, कर्ज प्रक्रीया सुकर केली, बंदरे ,जेट्टी ,फिशींग हार्बर, बाजारपेठ तयार केली. मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी वाढत असून नुकतीच पंतप्रधानांनी येथे विमानतळाची आम्ही केलेली मागणी मंजूर करून विमानतळ बनवण्याची घोषणा केली. वाढवण सारखे महाकाय बंदर, नजिकच्या काळात येथून जाणारी बुलेट ट्रेन आणि विरार पर्यंत पोहोचणारा कोस्टल रोड या कामांमुळे पालघर विकासाच्या केंद्रस्थानी येणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारने व महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांची सविस्तर माहिती देत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘आई भवानीच्या चरणी आज मागू जोगवा, लाल बावटा आणू खाली, वर नेऊ भगवा’ …असा नारा दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *