विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्राकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणूकांची अधिकृत घोषणा होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपाच्या रणनीतीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती मंत्रिंडळाच्या सचिवांनी संध्याकाळी दिली.

विशेष म्हणजे गुजराती भाषा ही मराठी भाषेच्या निर्मितीनंतरची असताना लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गुजराती भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस असून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यासाठी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले. त्याचबरोबर राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचेही यावेळी जाहिर केले.

मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।। या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे स्वप्नपूर्ती आहे. निती आयोगाच्या बैठकीतही मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. या निर्णयामुळे आपल्या प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे. मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा हा निर्णय आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेल्याने दुधात साखर असा योग जुळून आला आहे. यासाठी आपल्या लाडक्या मराठीचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानतो. मराठी भाषा प्रगल्भ आहेच. आता तिचा प्रचार, प्रसार आणखी जोमाने करता येईल. मराठी भाषा आपल्या संतांनी जतन केली, वाढवली. तिचा आपण व्यवहारात आवर्जून वापर केला पाहिजे, मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या मराठी भाषक, विचारवंत, भाषा अभ्यासक- संशोधक, साहित्यिक आणि समीक्षक अशा सर्वांचे आभार मानले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *