एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन, ‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’ स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार

साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.

यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० लाख रोजगारनिर्मितीचा होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे एक लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एमएमआरडीएच्या वतीने ४६ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईला वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी बीकेसी–कुर्ला ७० किमी टनेल, बोरिवली–ठाणे टनेल आणि मुलुंड टनेल प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामुळे राज्याची सर्व क्षेत्रात प्रगती सुरू असून एकही काम केले नसल्याचा विरोधकांनी केलेला दावा त्यांनी उदाहरणासहीत खोडून काढला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य सहकारी मंत्री उपस्थित होते.

अधिवेशनापूर्वीच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारावर टीका करत एकनाथ शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केवळ सत्ताधाऱ्यांचे नसून विरोधकांनी सभागृहात येऊन प्रश्न विचारावेत. पायऱ्यांवर आंदोलन करण्यापेक्षा चर्चेत सहभागी व्हावे. विरोधी पक्षनेते, सभापती व अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, जनतेने जेवढी संख्या दिली नाही त्याची खंत सभागृहाबाहेर आंदोलन करून भरून निघणार नाही; संख्या किंवा पद महत्त्वाचे नसून आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.

दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समिटचा संदर्भ देत त्यांनी देशाची बदनामी करण्याच्या कृतींवरही टीका केली. देशात आणि परदेशात पंतप्रधानांची व भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न देशप्रेम नसल्याचे त्यांनी म्हटले आणि अधिवेशनात अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एमएमआरडीएच्या कामांदरम्यान घडलेल्या दुर्घटनेबाबत बोलताना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे, संबंधित कंपनीला ५ कोटी रुपये व सल्लागाराला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. चार जणांना अटक करण्यात आली असून सेफ्टी व स्ट्रक्चर ऑडिटचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व एमएमआरडीएमार्फत प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कोणालाही पाठीशी घालणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सिंचन क्षेत्रात १२५ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगत सुमारे ९० हजार कोटींची मंजुरी दिल्याचे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी तसेच विदर्भाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोशिर, शिरवाड आणि काळू धरणांसाठीही निधी मंजूर केल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचे सांगत एनडीआरएफचे निकष दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्यात आली असून दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर विरोधकांनी टीका करून न्यायालयात धाव घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ४५ हजार कोटींचा मोठा आर्थिक भार असूनही योजना यशस्वीपणे सुरू केली. “आम्ही घोषणा करून विसरणारे नाही; जे बोलतो ते करून दाखवतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

औद्योगिक गुंतवणुकीबाबत बोलताना त्यांनी दिल्लीतील समिटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज समूहाने एआय क्षेत्रात १० लाख कोटींची गुंतवणूक जाहीर केल्याचे नमूद केले. उद्योगपतींना सुरक्षा व प्रोत्साहन देणे आवश्यक असून पूर्वी त्यांच्या घराबाहेर काय प्रकार होत होते हे सर्वांना माहिती असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले असून उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ यामुळे राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अधिवेशनावर शोकछाया असल्याचे नमूद करत, त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करून अधिवेशनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

आगामी अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असून राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहीत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी, गरीब व उद्योग क्षेत्राला चालना देणारा ठरेल, असे सांगत त्यांनी विरोधकांना सभागृहात येऊन रचनात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. “सभागृहात या, प्रश्न विचारा; आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत,” असे स्पष्ट करत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल कायम ठेवला.

 

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, आता… ‘ गाव तिथे ’ नव्हे तर… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! एसटी बस आदीवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *