एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, आमच्यात मतभेद नाही, विधान परिषद निवडणुकीत महायुती १७ पैकी १७ जागा जिंकणार मराठा समाज, समान नागरी कायदा आणि विकासावर सरकार ठाम

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी महायुती एकजुटीने निवडणूक लढवणार असून सर्व १७ जागांवर विजय मिळवणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागावाटप सन्मानाने होईल, असे सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला असल्याचे सांगत, “महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्र काम करत आहोत आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने पुढे नेत आहोत. एक तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना आमच्या आधी मीडियालाच एवढी घाई का झाली आहे? असा सवालही केला.

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पूर्णपणे संवेदनशील असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याचे सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना अजितदादा आणि देवेंद्रजींसोबत मिळून मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय, न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना आणि १० टक्के आरक्षण देण्याचे काम आम्ही केले, असे सांगत सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातूनही समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचेही स्पष्ट केले.

आसाममध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत एकनाथ शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचे अभिनंदन केले. एक देश, एक कायदा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका सुरुवातीपासूनच राहिलेली असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा एका देशात दोन कायदे असू शकत नाहीत, असे सांगत, महाराष्ट्रातही या विषयावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची राम मंदिर, कलम ३७० हटवणे आणि समान नागरी कायदा ही तीन स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पूर्ण झाली असून तिसरे स्वप्नही पूर्ण होईल, आदिवासी तसेच अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या आरक्षणावर समान नागरी कायद्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करत, काहीजण समाजात दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला.

खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती मजबूत आहे आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. भारतीय जनता पक्ष हा देशातील नंबर एकचा पक्ष असून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाची ताकद असल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची भाषा करणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे, असा उपरोधिक टोला लगावला.

मुंबईतील बीच कँडी क्लब येथे मेंबरशिपसाठी युरोपियन पासपोर्टची अट असल्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली. मुंबईत असा कोणताही भेदभाव करणारा क्लब असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, देशात लॉकडाऊन सारखी स्थिती… आरसी बुक बघून इंधन देण्यात येत असल्याचा आरोप

देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजपा सरकार मात्र धार्मिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *