एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले असून खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी या निकालातून स्पष्ट केले आहे.”

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला मोठे यश मिळाले असून, भाजपाने सेंच्युरी करत नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे, तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी पार करत नंबर दोनचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. कमी जागा लढवूनही शिवसेनेने जास्त जागा जिंकत नगराध्यक्ष पदांवर आपला दबदबा निर्माण केला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची एकत्रित बेरीजही अनेक ठिकाणी एकट्या शिवसेनेपेक्षा कमी असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना केवळ ठाणे किंवा मुंबईपुरती मर्यादित असल्याचा आरोप फेटाळून लावला तसेच, “कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. या निवडणुकांत कोकणासह रायगड, पालघर आणि इतर भागांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठे यश मिळवले असून, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचला आहे.” या निकालाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे नमूद केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, जनतेला काम करणारा नेता हवा असतो, विकास आणि मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य देणारा पक्ष हवा असतो आणि म्हणूनच मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला, असे शिंदे म्हणाले. शिवसेना नेहमीच संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभी राहिली असून, “संकट शिवसेना” हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या मनात आहे, असेही सांगितले.

या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले. तळागाळात काम करणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांशी नाळ जोडली आणि म्हणूनच हा विजय मिळाला, असे सांगत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत सांगितले की, गेल्या साडेतीन वर्षांत महायुती सरकारने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आशावाद व्यक्त करत एकनाथ शिंदे म्हणाले की, “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.” लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्ट्राइक रेट पाहता पुढील निवडणुकांतही महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *