राज्यपाल यांची ग्वाही, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर शासनाचा भर मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केले.

राज्य विधानमंडळाच्या २०२६ या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल अभिभाषणाद्वारे झाली, त्यावेळी राज्यपाल देवव्रत बोलत होते. विधानमंडळात अभिभाषणाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य तसेच दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.

सीमावाद सोडविण्यासाठी ठोस पावले

राज्यपाल आचार्य देवव्रत अभिभाषणात म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण, समावेशक आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध असून सर्वोच्च न्यायालयात राज्याची भक्कम बाजू मांडण्यासाठी नामांकित वकिलांची नियुक्ती केली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी शिक्षण, आरोग्य व विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर

पुढे बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, महाराष्ट्राचा देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात १३.५ टक्क्यांहून अधिक वाटा असून २०२४-२५ या वर्षात राज्याला ₹१,६४,८७५ कोटींची थेट परकीय गुंतवणूक प्राप्त झाली. ही देशातील एकूण गुंतवणुकीच्या ३९ टक्के आहे. २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत ₹९१,३३७ कोटींची गुंतवणूक राज्यात आली आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत पुढे बोलताना म्हणाले की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०२६ मधील दावोस येथील परिषदेत सुमारे ₹३० लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून ४० लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन करण्यात आले आहे.

नवे उद्योग धोरण आणि स्टार्टअपला चालना

राज्यपाल आचार्य देवव्रत पुढे बोलताना म्हणाले की, ‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५’अंतर्गत ₹१७.५० लाख कोटी गुंतवणूक व ५० लाख रोजगाराचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांबू, रत्न-आभूषण, एव्हीजीसी-एक्सआर तसेच जागतिक सामर्थ्य केंद्र धोरण जाहीर करण्यात आले. गडचिरोलीला स्टील हब तर पूर्व विदर्भाला स्टील कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याची योजना आहे. ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नवोन्मेष धोरण २०२५’द्वारे पुढील पाच वर्षांत १.२५ लाख उद्योजक व ५० हजार स्टार्टअप्सना सहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे.

निर्यात सज्जता निर्देशांकात राज्य अव्वल

पुढे बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, नीती आयोगाने जानेवारी २०२६ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘निर्यात सज्जता निर्देशांक २०२४ मध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे.  त्याचबरोबर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडील निवडक पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाकडे हस्तांतरित करण्यास आणि सार्वजनिक व खाजगी गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाचा भार कमी होऊन नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधील गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

पायाभूत सुविधा व सागरी विकास

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, राज्याच्या आर्थिक व औद्यागिक विकासाला गती देण्यासाठी ₹४,४७८ कोटींच्या १४७ प्रमुख रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईतील ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’दरम्यान सुमारे ₹५६,००० कोटींचे करार झाले. जहाजबांधणी, दुरुस्ती व पुनर्वापर धोरण जाहीर करण्यात आले आहे.

कृषी क्षेत्रशेतकरी सक्षमीकरणावर भर

राज्यपाल आचार्य देवव्रत पुढे बोलताना म्हणाले की, ‘महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण’ लागू करून शेती अधिक उत्पादक करण्यावर भर देण्यात आला आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत ३.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर ७,००० शेतकरी गट कार्यरत आहेत. कापूस व सोयाबीन खरेदी, पीकविमा व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ₹१५,५७६ कोटींची थेट मदत देण्यात आली.

पुढे बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’अंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत असून ४४ लाख शेतकऱ्यांना ₹२५,०८७ कोटींचा दिलासा देण्यात आला आहे. सौर पंप बसविण्यात राज्याने विक्रम प्रस्थापित केला असून त्याची दखल गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. तसेच राज्याच्या जल संधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्याचे प्रथम पारितोषिक महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील पूर व अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना १५,५७६ कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

महिला व आदिवासी सक्षमीकरणासाठी कटिबद्ध

पुढे बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, ‘उमेद’ अभियानांतर्गत ६.६० लाख महिला बचतगटांना बँक कर्ज उपलब्ध झाले असून २६ लाखांहून अधिक महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. आदिवासी महिलांसाठी ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना’ जाहीर करण्यात आली.

शिक्षणकौशल्य व आरोग्य

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठने कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्ससारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे. डिप्लोमा अभ्यासक्रमांची १५४ विषयांची शैक्षणिक सामग्री मराठीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष धोरण लागू करण्यात आले आहे.

कर्करोग उपचारासाठी व्यापक कॅन्सर केअर धोरण राबविण्यात येत असून दुर्मिळ अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील ११ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चित्रपट निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ₹३,६६१ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रातील गौरव

बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख तसेच भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर पहिल्या टी-20 अंध महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्याबद्दल हिंगोलीची खेळाडू गंगा कदम यांचा सत्कार करण्यात आला आहे, असे राज्यपाल आचार्य देवव्रत आपल्या अभिभाषणात म्हणाले.

 

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन, ‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’ स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार

साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *