हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न

राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, रेहाना रेयाज चिस्ती, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, मोहन जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून पैशाचा प्रचंड वापर केला जात आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात आघाडी आहे. भाजपा महायुती सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. शेतकरी, बेरोजगारी, महिला, कायदा सुव्यवस्था याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रातील जनता काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत विजयी करेल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मुंबईत काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे तशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबई वगळता इतर ठिकाणी समविचारी पक्षांशी चर्चा सुरु आहे पण जेथे आवश्यकता आहे तेथे भाजप महायुती सोडून इतर समविचारी पक्षांशी आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची विभागवार जबाबदारी दिलेली आहे, रणनिती ठरवणे, प्रचार यात ते सक्रीय आहेत असेही सांगितले..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भात टिळक भवनमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नुकतीच दोन दिवस सविस्तर चर्चा झालेली आहे. राज्यातील २८८ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुका व २८ महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसदर्भात आज चर्चा करण्यात आली आहे. आमचा लढा वैचारिक असून राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेस पक्ष लढा देत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न दिसत आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे, महाराष्ट्र विकण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *