हर्षवर्धन सपकाळ यांचा आऱोप, राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणारे मोदी व RSS चे ‘खास’ लोक राम मंदिरासाठी दिलेल्या सोने चांदीच्या विटांचा हिशोब द्या, ‘मैं भी खाऊंगा, मेरे लोगों को भी खाने दूंगा’, हे चालणार नाही

मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग मस्तकात जाणारा आहे, पण रामाच्या व हिंदूच्या नावावर राजकारण करणारा भाजपा व रा. स्व. संघाचा एकही नेता या दरोड्यावर बोलत नाही. प्रभू रामाला भक्तीभावाने दान-देणग्या देणाऱ्या भाविकांचा हा घोर अपमान आहे. हिंदूंचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या बदमाशांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या प्रवृत्तींचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या चोरी व पैशाच्या अफरातफरी प्रकरणात चौकशीदरम्यान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे प्रमुख चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला. पण या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही किंवा त्यांना अटकही केली नाही. या प्रकरणी मुख्य आरोपींना सोडून इतर आठ छोट्या कर्मचा-यांवर चोरी आणि कट रचल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सुत्रधारांना मोकाट सोडून मोदी सरकार “चोर सोडून संन्यासाला फाशी” देण्याच्या प्रयत्न करत असल्याची टीकाही यावेळी केली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त चंपत राय यांचे लागेबांधे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहेत, परंतु त्यांनाच मोकळे सोडून अटक केलेल्यांमध्ये दान मोजणी करणारे कर्मचारी, मोजणी प्रक्रियेचे प्रमुख, प्रक्रियेवर देखरेख करणारे निवृत्त बँकर आणि राम मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त चंपत राय यांचे चालक व विश्वासू रामाशंकर यादव (उर्फ ‘तिन्नू’) यांचा समावेश आहे. घोटाळा करणारे निकटवर्तीय मोकाट आणि कर्मचा-यांना अटक हे म्हणजे “मोदी है तो मुमकीन है!’’ असा प्रकार असल्याची खोचक टीका केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक भाविक भक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी सोने आणि चांदीच्या विटा, हि-याचे दागिने चंपत राय यांच्याकडे दिल्याचे लोक आता समोर येऊन सांगत आहे. सिंधी समाजाने २०० किलो चांदीच्या विटा दिल्या आहेत. पण त्यांना साधी पावतीही मिळाली नाही. रामाच्या नावाने लोकांनी श्रध्देपोटी दिलेल्या शेकडो हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम, दागिने, सोने-चांदीच्या विटा, हि-याचे हार, दागिने याचा कोणताही हिशोब ट्रस्ट सार्वजनिक करत नाही, त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे असे दिसते. राम मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाशी संबंधित आहेत. त्यामुळेच या घोटाळेबाजांवर अद्याप कारवाई केली जात नाही.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, असंख्य रामभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या या घोटाळ्याप्रकरणी कलम ३०६, ३१६(५), ३१७(४), ३१७(५), ६१ आणि ३(५) नुसार सौम्य गुन्ह्यांचा एफआयआर (FIR) दाखल झालेला आहे. वास्तविक पाहता सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सदर प्रकरणाचा तटस्थ आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. मोदी सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तरी त्यांनी ताबडतोब सदर चौकशी लावावी, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबडतोब नोंदणी करून त्यांचा अंकेक्षण अहवाल देखील जाहीररित्या प्रकाशित करावा अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

आदिती तटकरे यांची माहिती, कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी महिला व बालविकास आणि कामगार विभाग समन्वयाने करणार काम

राज्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *