हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पुण्यात न्यायालयाच्या दारात अराजकतेचा कळस, महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का? कोकणातील रासायनिक प्रकल्पांमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी, कोकणचा विकास करणारे व रोजगार देणारे प्रकल्प हवे विनाश करणारे नाही

न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो हे अराजकतेचे लक्षण असून गुन्हेगारांना कायद्याचे वा पोलिसांचे काही भय राहिलेले नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ते मान्य करत नाहीत कारण त्यांना कशाचेही गांभिर्य नाही. फडणवीसांना महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा आहे का ? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

शिवशंभू स्वराज्य संघटनेने महाड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली तसेच पाचड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीला मानवंदना दिली.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा मोठा गाजावाजा केला पण मागील १२ वर्षांपासून हा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून लाडक्या ठेकेदारासाठी १२ वर्षांपासून कोकणच्या जनतेला वेठीस धरले आहे. मुंबई गोवा महामार्ग हा नितीन गडकरी यांच्या नाकर्तेपणाचा उत्तम नमुना आहे, असेम्हटले आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अदानी-अंबानी यांचे हायड्रो प्रकल्प व खाणींना भाजपा सरकार मान्यता देत असून या प्रकल्पांमुळे कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तलही प्रचंड प्रमाणात केली जात आहे, ती थांबवली पाहिजे पण भाजपा महायुती सरकार उद्योगपतींसाठी कोकणची जनता व पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहे. अनेक प्रकल्पांतून रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे, त्यामुळे पाणीही दुषीत झाले आहे. कोकणात प्रकल्प आले पाहिजेत, ज्यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे, कोकणचा विकास झाला पाहिजे पण हे प्रकल्प कोकणच्या हिताचे नाही तर कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणारे आहेत.

हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात यावर्षी भीषण दुष्काळ पडला आहे, शेतकरी शेतमजूर व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. चारा पाण्याची मोठी समस्या असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही आहे. सरकारने ३१० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत पण त्यातही हेवेदावे केले आहेत. दुष्काळ जाहीर करून मदतीची घोषणाही केली. दिवाळीआधी सर्व पात्र शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत थेट बँक खात्यात जमा होईल असा दावा सरकारने केला होता पण दिवाळी संपली तरी आजही लाखो शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. महायुती सरकारने दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असेही सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी ‘वॉटर कप अभियायानाला’ लोकचळवळीचे बळ द्यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सत्यमेव जयते वॉटर कप ’ स्पर्धेचा शुभारंभ

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *