Breaking News

जयंत पाटील यांचा सवाल, या पुतळ्याचे टेंडर न काढता त्यालाच कसे कंत्राट मिळाले? आपटे कोणी शोधला? नेव्हीला त्याची माहिती कोणी दिली? तो कल्याणचाच कसा?

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उबाठा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला. तसं असतं तर दोन-तीन झाड पडली असती पण तसं न होता फक्त पुतळा पडला याचा अर्थ पुतळ्याच काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचे काम दिले. दीड – दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला ३५ फुटाच्या पुतळ्याचे काम दिले. सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला. सरकारला हात झटकून चालणार नाही, यात सरकार जबाबदारी ही सरकारची आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार आपटे कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा कसा दाखल केला? गुन्हा दाखल करणे म्हणजे आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप सरकार करत आहे अशी टीका असताना सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. सरकार काम फक्त टेंडर काढणे, जवळच्या लोकांना कंत्राट देणे, त्या कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करायला तयार नाही असा आरोप करत सरकारने राज्यभरातील शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी केली.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणाची जर सरकारला खरंच चौकशी करायची असेल तर दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी बसून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड करावी आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी अशी सूचनाही यावेळी केली.

शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल

मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना जयंत पाटील पुढे म्हणाले की, स्थानिक मंत्री सांगतायत की, ‘या वाईटातून काहीतरी चागलं होईल’. मला अशा मंत्र्यांच्या बुध्दीची कीव वाटते. मंत्री महोदय नक्कीच चांगलं होणार, शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल. ज्यांना २८ फुटाचा व्यवस्थित पुतळा उभारता आला नाही ते आता १०० फुटाची चर्चा करतायत असा टोलाही शेवटी लगावला

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *