जयंत पाटील यांचा टोला, महायुतीचे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा

हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारला लगावला.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून आपण संबोधायचो. “पुणे तिथे काय उणे” असं आपण अभिमानाने म्हणायचो, मात्र आता असं म्हणावं लागतंय “पुणे जिथे फक्त घडतात गुन्हे.” शहराची प्रचंड बदनामी होत आहे. गुन्हेगारांचा मोर्चा आता नागपूरकडे वळला आहे. सरासरीने तीन दिवसात एक खून शहरात घडत आहेत. या टोळ्यांना कोण पोसते आहे, याचा खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात ही परिस्थिती आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे काय? असा उपरोधिक सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री एक अभ्यासू व्यक्तीमत्व व जबाबदार व्यक्ती आहे. पण त्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूबद्दल सभागृहाची दिशाभूल केली होती. मात्र कोर्टाने सोमनाथचा मृत्यू मारहाणीमुळेच झाले असल्याचे स्पष्ट केले आहे व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गृहखात्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारीच अनेक गंभीर गुन्ह्यात अडकले आहेत. कुंपणच आता शेत खायला लागलं आहे. हुंडा घेतला जात नसल्याचं अनेकांना वाटत असलं तरी परिस्थिती वेगळी आहे. अद्यापही महिलांना श्रीमंत, सुशिक्षित घरात हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यात पुणे, मुंबई आघाडीवर आहे. ज्या महाराष्ट्रातून स्त्री शिक्षणाची चळवळ उभी राहिली हाच महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न पडतोय. महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायक असल्याची टीकाही यावेळी केली.

जयंत पाटील म्हणाले की, हेट स्पीचच्या यादीत महाराष्ट्रातील एक मंत्री प्रथम क्रमांकावर आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात ही भूषणावह आहे का? मधल्या काळात नाशिकच्या एका मोठ्या नेत्याचा सत्ताधारी पक्षातील एका पक्षात प्रवेश झाला. विशेष बाब म्हणजे याच पक्षाने सहा महिन्यांपूर्वी या प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर टीकेची झोड उठवली होती. हा व्यक्ती दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता सोबत पार्ट्या करतो असा आरोप थेट सभागृहात केला गेला आणि सहा महिन्यांनंतर लगेच याच व्यक्तीला त्या सत्ताधारी पक्षात प्रवेश दिला गेलाचा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, माझ्या पक्षाचे शिंदखेडा येथील पदाधिकारी कामराज निकम यांच्यावर राजकीय द्वेषापोटी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. माझा साधा प्रश्न आहे जर कामराज निकम यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तर त्यांच्यावरील हे आरोप मागे घेतले जातील का? इतका राजकीय द्वेष कशासाठी? सरकारला एवढे बहुमत आहे. की तुम्हालाच तुमच्या विजयाबद्दल शंका आहे का ? असा उपरोधिक सवाल करत जयंत पाटील पुढे म्हणाले की, कंत्राटदारांची बिले थकली आहेत. QR code द्वारे रस्त्याची गुणवत्ता, कंत्राटदार, इंजिनिअर आदींची संपूर्ण माहिती द्या, असे गडकरी साहेब म्हणतात. म्हणजे रस्ता उभारलेली यंत्रणा त्यास जबाबदार राहील.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीपूर्वी १७ महामंडळाची घोषणा केली. अस्तित्वात असलेल्या महामंडळाची अवस्था देखील दयनीय आहे. बनावट जीआर GR काढून कामं करण्याची प्रकरणं बाहेर आली आहेत. या भ्रष्टाचाराशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही यावेळी केली.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, नागपूर जिल्हयात शिक्षक भरती घोटाळा झाला. शासनाचे १ हजार कोटी रुपये हे बोगस शिक्षकांनी फस्त केले आहेत. एसआयटी SIT मार्फत चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. विविध विभागांचे काम ठराविक लोकांनाच मिळेल अशी व्यवस्था केली आहे. सर्व मलाई त्या त्रिमूर्तींकडे जात आहे. ते बलदंड व्हावेत हाच सरकारचा उद्देश आहे का? ही लूट थांबवली तर सरकारच्या लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येतील. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हा भ्रष्टाचार थांबवण्याचे धारिष्ट आणि इच्छाशक्ती दाखवावी असा टोलाही यावेळी फडणवीस यांना लगावला.

जंयत पाटील म्हणाले की, येऊर मधील शंभर एकरमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना निर्मल सोळंकी नामक बिल्डर दमदाटी करून बेदखल करतो. त्यानंतर त्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन राखीव वन म्हणून येतं. कुळात वेगळं नाव येतं. त्या आदिवासी लोकांनी दिलेली तक्रार मनावर घेतली जात नाही. मूळ रहिवाशांना बाजूला करून, जमिनीची प्लॉटिंग करण्याचे पाप महाराष्ट्रात होत असल्याचे सांगत जयंत पाटील पुढे म्हणाले की, सरकारचे वर्णन करताना मला एका मराठी पिक्चरची आठवण येते आहे आणि तो पिक्चर म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या वाक्याच्या प्रमाणे हे सरकार चालू आहे. गल्लीत इथे हे लोक गोंधळ घालतात पण दिल्लीत मात्र ते एकत्र जाऊन मुजरा करतात असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांचं पक्ष प्रवेशातच लक्ष आहे. आमच्या मुद्द्यांना बगल न देता मुख्यमंत्र्यांनी उत्तराचे भाषण करावे, ही आमची माफक अपेक्षा असल्याचा उपरोधिक टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *