जयंत पाटील यांचा सवाल,…मग हजारो कोटी जातात कुठे ? मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच

मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील घाटकोपर येथे संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, इतिहासाचे दाखले पाहता घाटकोपर हे चळवळींचे शहर आहे, असे प्रकर्षाने जाणवते. अण्णाभाऊ साठे नजीकच्या परिसरात राहायचे आणि त्या वास्तव्यात त्यांनी फकिरा ही कादंबरी लिहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी लिहिलेले साहित्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरले असे सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मुंबई आपल्याला सहजासहजी मिळालेली नाही. आज मुंबईला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप करत मध्यंतरी एक बातमी आली की पेटंट कार्यालयाचं मुख्यालय मुंबईतून थेट दिल्लीला हलवलं जातंय. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच IFSC ची कल्पना केंद्रात काँग्रेसप्रणित ‘यूपीए’ सरकार असताना मांडली गेली होती. त्यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भूखंड राखून ठेवला होता. मात्र हे केंद्र देखील रातोरात हलवलं. २६/११ चा हल्ला झाल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने नॅशनल मरीन पोलिस अकॅडेमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स केंद्र स्थापन करण्याचे ठरवले, मात्र आता ते गुजरात मध्ये नेले. मुंबईचा हिरेबाजार गुजरातला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक प्रकारे मुंबईची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही यावेळी केला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल करत विविध अपघातात सर्वसामान्य मुंबईकरांचा नाहक जीव जातोय. त्याची जबाबदारी घेतली जात नसल्याबद्दल खंतही बोलवून दाखवली.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पक्षाची विभागणी झाली. मात्र मुंबईच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. लोकांची सहानभूती आणि विश्वास ही पक्षाची खरी ताकद आहे, तसेच महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. पारदर्शीपणे आणि निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे लोकं नक्कीच उभे राहतात. त्यामुळे आपल्या वॉर्डमध्ये कसून तयारीला लागा असे आदेशही यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

About Editor

Check Also

मुंबईतून मतदानासाठी केरळला जाणाऱ्या नागरिकांच्या बसला हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवला झेंडा मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा: हर्षवर्धन सपकाळ

देशातील चार राज्ये व एका केंद्रशासीत प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत असून ९ तारखेला केरळमध्ये मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *