अपेक्षप्रमाणे दसरा सणानंतर विधानसभा निवडणूकीची आचार संहिता कधीही लागू होऊ शकते याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केल्याने आज सकाळी घाईघाईत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी ७ आमदारांची निवड करण्यात आली. तसेच या ७ आमदारांना विधानसभेत घाईघाईत शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांना आमदारकीची शपथ दिली.
या घाईघाईत उरकलेल्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत पाटील, मनिषा कायंदे या दोघांचा, अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या पंकज भुजबळ आणि इंद्रिस नाईकवाडी यांची, तर भाजपाकडून विक्रांत पाटील, चित्रा वाघ, बाबू गेणू राठोड या सात जणांना डॉ नीलम गोऱ्हे यांनी आमदार पदाची शपथ दिली.
शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांचे लोकसभे दरम्यान तिकीट कापत त्यांच्या पत्नीला वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी हेमंत पाटील यांचे राजकिय पुर्नवसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे हेमंत पाटील यांची वर्णी विधान परिषदेत लावण्यात आली. तसेच विद्यमान विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही ऐनवेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटाता प्रवेश केला होता. त्याची परतफेड म्हणून मनिषा कायंदे यांनाही राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करण्यात आले.
तर अजित पवार यांच्या पक्षाचे पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे इंद्रिस नाईकवाडी यांचीही राजपाल नियुक्त आमदार म्हणून शपथ देण्यात आली. तर भाजपाकडून भारतीय युवा मोर्चाचे विक्रांत पाटील, महिला मोर्चाच्या चित्रा वाघ आणि बंजारा समाजाचे मंहत बाबू गेणू राठोड यांनाही राज्यपाल नियुक्त आमदाराकीची शपथ देण्यात आली.
दरम्यान काल रात्री या सात आमदारांची निवड केल्याने महायुतीतील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत १२ राज्यपाल नियुक्त आमदारांपैकी ७ च आमदारांचा शपथविधी का अशी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही आज महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा उरकण्यात आला.
Marathi e-Batmya