मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. त्यानंतर मराठावाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये दौरा केले. त्यानंतर आज आंतरावली सराटी येथे आयोजित मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने आम्हाला एक महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले. त्याची मुदत उद्या २४ तारखेला संपत आहे. त्यानंतर सरकारला एक तासही आपण वाढवून देणार नसून २५ तारखेपासून कडक आमरण उपोषण करणार असल्याचे जाहिर करत यावेळी पाणी, कोणतीही वैयकीय औषधोपचार घेणार नसल्याचा इशारा दिला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता सरकारने नवे नाव आणले असून ईडब्लूएस देऊ त्याचा फायदा मराठ्यांना होईल असे सांगतायत. अर पण तुम्ही काय आम्हाला येडे समजता काय? असा सवाल राज्य सरकारला करत या योजनेचा एकाला तरी फायदा झाला काय ? एकाचे तरी नाव सांगा असा सवाल करत मराठ्यांचा नाद करू नका असा सज्जड इशाराही दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील मोठ्या गावाच्या त्या त्या भागातील सर्व गावकऱ्यांनी एकत्र जमा होत तेथेही कडक उपोषण करावे. हे उपोषण एकाच वेळी करावे असे आवाहन करत जो पर्यत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात राजकिय नेत्यांना प्रवेश बंदी जाहिर करावी असे आवाहन करत आमच्या गावात पुढाऱ्यांना यायचं असेल तर आधी आरक्षण आणायचं आणि त्यानंतरच गावात प्रवेश करायचा असा इशारा देत आरक्षण देते नाही तोपर्यत पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी जाहिर केली. याशिवाय पुढाऱ्यांना आम्ही गावाच्या सीमारेषेला पोहोचूही देणार नसल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, सकाळी नवं पिल्लू काढलंय ईडब्लूएसच आरक्षण देतोय म्हणून. पण ईडब्लूएस कोणी मागितलंय असा सवाल करत त्याचा फायदा कोणाला झाला उगीच कशाला आकडेमोड करता तुम्ही गणिताचे मास्तर होता का असा सवालही करत राज्य सरकारवर टीका केली.
तसेच मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रत्येक गावात सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचा आहे. हे सगळं शांततेत सुरु करायचं आहे. हे शांततेत सुरु झालेलं आंदोलन सरकारला झेपणार नाही. २५ ऑक्टोंबरला आंदोलनाची नवी दिशा सांगणार असल्याचं स्पष्ट करत सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी की मी आमरण उपोषण करणार असून राज्यातील पाच कोटी मराठे साखळी आमरण उपोषण आंदोलन चालवणार आहेत. सरकारने २४ ऑक्टोंबरच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अजून दोन दिवस आहेत. आंदोलनाची दिशा २५ तारखेला पुन्हा जाहिर करणार असून ते आंदोलन तुम्हाला पेलणारं नसेल. त्यामुळे हे आंदोलन तुमच्यासाठी सोपं आहे असं वाटेल पण सुरु झाल्यावर तुम्हाला झेपणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya