राज्यात लव्ह जिहादच्या एक लाख प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. मात्र त्यांच्याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरपासून लव्ह जिहादचे एकही प्रकरण घडलेले नाही. त्यामुळे लोढा हे खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले असून त्यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आझमी यांनी आज विधानसभेत केली.
यावेळी लोढा यांच्याविरुध्द हक्कभंग दाखल केला असल्याचेही अबु आझमी यांनी सांगितले.
पाँईट ऑफ इन्फार्मेशन अर्थात माहितीच्या मुद्याद्वारे अबू आझमी यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. महिला व बालविकास विभागाने डिसेंबरमध्ये लव्ह जिहादविरोधात एक समिती बनवली. त्या समितीकडे लव्ह जिहादचे एकही प्रकरण नोंद झालेले नसल्याची बाबही अबु आझमी यांनी सभागृहाच्या निदर्शास आणून दिली.
लव्ह जिहाद असे काहीच नसून केवळ लोकांना भडकवायचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडवायची असे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी रचले असल्याचे आझमी म्हणाले.
लव्ह जिहादची एक लाख प्रकरणे घडल्याचे लोढा यांनी सांगितल्यापासून राज्यात विनापरवाना हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. त्या मोर्चांमध्ये भडकावू वक्तव्ये केली जात आहेत, असा आरोपही आझमी यांनी केला. याबद्दल आपण लोढा यांच्याविरोधात हक्कभंग सादर केला असून तो स्वीकार केला जावा अशी मागणीही आझमी यांनी केली.
Marathi e-Batmya