आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत अहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील, असा कडक शब्दात शिवसेनेने एका पत्रकार परिषदेत गणेश नाईक यांना इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, युवा सेनेचे अनिकेत म्हात्रे, महिला आघाडीच्या सरोजताई पाटील उपस्थित होते.
खासदार नरेश मस्के म्हणाले की, नवी मुंबईतील भूमिपुत्र, माथाडी कामगार आणि झोपडट्टीधारकांना मोफत घरे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव एफएसआय, नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांसाठी ७० कोटींचा निधी शासन देणार असून अवघ्या काही वर्षातच नवी मुंबईकरांच्या दारात विकासाची गंगा शिंदे यांनी आणली आहे. नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून शिंदे साहेबांविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील, असा इशाराही दिला.
पुढे बोलताना नरेश मस्के म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आहे. तरीही सातत्याने गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत आहेत. दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. आज खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी सवांद साधताना कडक शब्दात अंतिम इशारा दिला.
नरेश मस्के पुढे बोलताना म्हणाले की, नवी मुंबई मध्ये घराणेशाही लादणाऱ्या गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांना गेली अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. सत्तेत असूनही नागरिकांचे कोणतेच प्रश्न मार्गी लावलेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवी मुंबईकरांनी गाऱ्हाणे घातले. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला.
पुढे बोलताना नरेश मस्के म्हणाले की, नवी मुंबईतील नागरिकांना अधिक चांगली घरे, योग्य पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतला तरीही यावर आक्षेप असणे दुर्दैवी आहे. नवी मुंबईतील घरे सिडकोने बांधली आहेत. आता त्यातील काही इमारती जुन्या झाल्या आहेत. वाढीव एफएसआयमुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक भूमिपुत्र, माथाडी कामगार, झोपडपट्टीधारकांनी गरजेपोटी वाढीव बांधकाम केले आहे. वाढीव एफएसआयमुळे मोठी व मोफत घरे नवी मुंबईकरांना मिळणार आहे. मात्र येथील जनता आता गणेश नाईक यांच्या बिल्डर लॉबीला भीक घालत नसल्याने त्यांची चिडचिड होत असल्याचा आरोपही केला.
शेवटी बोलताना नरेश मस्के म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या मूलभूत सुविधांसाठी ७० कोटींचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपलब्ध करून देणार आहेत. हा मूळ प्रस्ताव गणेश नाईक यांचाच होता. मग आता मात्र त्यालाही आक्षेप आपण घेत अहात. कंडोनियम अंतर्गत बांधलेल्या इमारतींना नागरी सुविधा आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार आहे. कोव्हीडमुळे नवी मुंबई महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. शिंदे साहेबांनी यासाठी भरवी निधी देत आहेत. त्यामुळे रस्ते, उड्डाणपूल बांधले जात आहेत. गणेश नाईक हे मंत्री, पालकमंत्री असताना असे निर्णय का घेतले गेले नाहीत? आज हे निर्णय होत असताना, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे हे जनतेच्या हिताविरुद्ध जाणारे आहे. एकनाथ शिंदे हे केवळ खुर्चीपुरते सिमित नसलेले, तर रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारे नेतृत्व आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखे ऑनलाईन नव्हे, प्रत्यक्ष कृतीतून नेतृत्व सिद्ध केले आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळेच काहींना अनेक वर्षांनी मंत्रिपद मिळाले, हे विसरून चालणार नाही. आमच्या नेत्यांना तुम्ही नालायक म्हणणार असाल तर तुमच्या नालायकपणाचे व्हिडिओ व्हाट्सएपचे पुरावे जे नवी मुंबईत फिरत होते ते भविष्यात चित्रपटगृहात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
Marathi e-Batmya