जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही असा सज्जड इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता दिला.

महाविकास आघाडीच्यावतीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महायुती सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलनानिमित्त मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते.

नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती आहे. असा घणाघाती हल्लाबोलही यावेळी महायुती आणि भाजपावर केला.

मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा. छत्रपती शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, CWC सदस्य खा. चंद्रकांत हंडोरे, CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, आदित्य ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छोटेखानी झालेल्या सभेनंतर हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.

 

About Editor

Check Also

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ; कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ आणि प्रोत्साहनपर अनुदान असे घटक

राज्यातील शेतकरी बांधवांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळवून देणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *