नाना पटोले यांची टीका, …भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध, कंत्राटी भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू

राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते, त्याचा भाजपाला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे, पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नसल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरु झाली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देईल, असे वाटत नसल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *