नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजिन असून राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भरला, त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने राज्यातील घरे फोडून संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी-शहा यांना खूश करण्यासाठी एकनाथ शिंदे व अजित पवार हे राहुल गांधी यांच्यावर टीका करतात पण त्याचा काही फरक पडणार नाही. सोलापुरच्या विकासात भाजपा हा मोठा अडसर ठरला आहे, हा अडसर लोकसभा निवडणुकीत दूर करा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.

या सभेला संबोधित करताना माकप नेते नरसय्या आडम यांनी भाजपावर जोरदार निशाना साधला, रे नगर वसाहतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. मात्र या योजनेची सुरवातच २०१३ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. भाजपा सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून दिला का? असा संतप्त सवालही यावेळी केला.

आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहीर सभा पार पडली व त्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपाने १० वर्षात विश्वासाने सोलापुरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली आणि लोकांना गरज असताना त्यांच्याकडे पाठ फिरवली. ही लढाई आपल्या सगळ्यांची असून निवडणुकीत भाजपाला जागा दाखवून द्या. सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी या लढाईत विजयी होण्यासाठी आर्शीवाद द्यावा, असे आवाहन यावेळी केले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *