Breaking News

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा, व कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली.

विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरुषांची, विचारवंत व समाजसुधारकांची भूमी आहे. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली.

नाना पटोले आपल्या पत्रात म्हणाले की, विशाळ गडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे, न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळ गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली १४ तारखेला विशाळगडापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी केलेले विधान राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वा दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून विशिष्ट धर्माला भिती घालण्याचे व या प्रकरणाला वेगळा रंग देणारे आहे, गृहमंत्र्यांचे विधान हे एकप्रकारे दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे, आम्ही या विधानाचाही निषेध करतो. १४ जुलै रोजी जो हिंसाचार झाला ते सरकार आणि प्रशासनाचे फक्त अपयशच नाही तर प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे असा आरोपही यावेळी केला.

नाना पटोले म्हणाले की, माजी खा. छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात हाक दिली होती. त्यासाठी हजारो तरुण विशाळगडाकडे येणार, याची कल्पना असूनही प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. गजापूर गावातील ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे तसेच प्रचंड दहशतीत असलेल्या गावकऱ्यांना सरकारने विश्वास दिला पाहिजे. सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिका-यांवरही कारवाई केली पाहिजे. राज्यात सामाजिक सलोखा व शांतता रहावी यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची आपली जबाबदारी आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी धर्माच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी या अपप्रवृत्तींना ठेचून काढा, अशी मागणही यावेळी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांना नाना पटोले यांनी पाठविलेले पत्र

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *