मराठी ई-बातम्या टीम
१७० आमदारांचा पाठिंबा असणार्या सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी १२ नावे पाठवली. त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशामध्ये बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असे अनेक सवाल करतानाच नावे फायनल करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. परंतु लोकशाही पध्दतीने नावे आल्यानंतर जी नियमावली आहे त्यात बसतात का? हे चेक करून त्यांना आमदार होण्याची संधी दिली पाहिजे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.
राज्यपालांचे अधिकार कमी करता येत नाही असा विरोधकांनी आरोप केला असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
अधिकार कमी केले जात नाही. यासंदर्भात जी समिती आहे ती समिती पाच-सहा जी काही योग्यतेनुसार नावे असतात ती सिलेक्ट करतात. त्यातील दोन नावे सरकार राज्यपालांकडे पाठवते. राज्यपालांनी एक नाव फायनल करायचे असते. ही नावे पाच-सहा नावे सरकार ठरवत नाही ती समिती ठरवते. यात सरकारचा हस्तक्षेपाचा प्रश्न येतो कुठे? कशाचं राजकारण सरकार करतंय सांगा ना असा सवालही त्यांनी केला.
आरोप तर सध्या खुप सुरु आहेत. सध्या काहींना आरोपांशिवाय काही राहिलेलं नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश – अजित पवार
राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयाने बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत शरद पवारांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेने, संपूर्ण ताकदीने लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने सर्वशक्तीनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिले. त्यातून मिळालेले हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल अशी भावना त्यांनी व्यक्त केला.
बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचे पालन करण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असले तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Marathi e-Batmya