पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच राणा दांम्पत्याचा सवाल अजित पवार तेव्हा झोपले होते का?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील जागे करीता एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत रवि राणा यांना पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावरच नवनीत कौर या दोन वेळा अमरावतीतून खासदार म्हणून निवडूण आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील मेळघाट, धारणी या आदीवासी बहुल भागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर मात्र खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवि राणा यांनी अजित पवार यांनाच सवाल करत तेव्हा झोपले होते का? असा खोचक सवाल केला. विशेष म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीतील राणा दांम्पत्याने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर राणा पती पत्नीकडून हा सवाल करण्यात आला आहे हे विशेष.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी मेळघाटातील काही गावांमध्‍ये जाऊन तेथील आदिवासींशी संवाद साधला आणि कुपोषणाच्‍या स्थितीचा आढावा घेतला. उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार राज्‍य सरकारने कुपोषण रोखण्‍यासाठी तातडीने उपाययोजना करायला हवी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आणि विधिमंडळाच्‍या अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करून हा प्रश्‍न मांडणार असल्‍याचे जाहीर केले.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन केवळ दोन महिने झाले आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीची सत्ता होती, अजित पवार हे उपमुख्‍यमंत्री होते. मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना तेव्‍हा त्‍यांनी मेळघाटचा दौरा का केला नाही, तेव्‍हा ते झोपले होते का? असा सवाल करीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्‍या शनिवारच्‍या मेळघाट दौऱ्यावरून टीका केली.

तर, महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्याच होत्या. मेळघाटात तीन महिन्यामध्ये पन्नासच्यावर बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मेळघाटात दिला जात होता, तेव्हा अजित पवार झोपले होते का? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला.

यशोमती ठाकूर या त्यावेळी महिला व बालविकास मंत्री होत्या. त्यावेळी अजित पवार यांनी ठाकूर यांच्यावर कारवाई केली असती, तर कदाचित ५० बालकांचे मृत्यू रोखता आले असते. अजित पवार यांनी राज्य सांभाळले, अधिकारी आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पाठीशी घातले. आता मात्र आदिवासींची भेट घेत आहेत. अजित पवार यांनी योग्य‍ वेळी कारवाई करायला हवी होती असेही रवी राणा म्हणाले.

याशिवाय, योजना राबविताना जे कंत्राटदार भ्रष्टाचार करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

About Editor

Check Also

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *