बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दिशेने होता. यावेळी झालेल्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज एकदा तहकूब करावे लागले.
आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर भाजपाचे आमदार अमित साटम यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. दिशा सालियनचा मृत्यू जून २०२० मध्ये झाला. त्यानंतर सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डिसेंबर २०२२ मध्ये एसआयटी स्थापन केली. आता दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी साटम यांनी केली. या मागणीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी समर्थन केले.
त्यानंतर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे, अशांना अटक केली जाते. त्यामुळे आघाडी सरकरमधील माजी मंत्र्याला त्वरित अटक करून चौकशी करावी, अशी मागणी राणे यांनी केली. सामान्य माणसाला जो न्याय तोच न्याय माजी मंत्र्यांना लावण्यात यावा, असेही राणे म्हणाले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री मागणी करत नाहीत ते मागणी पूर्ण करत असतात, अशा शब्दांत राणे यांचे कान टोचले. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी राणे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. दिशा सालियन प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही केली.
यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. सालियन मृत्यूची चौकशी करणाऱ्या एसआयटीचा अहवाल अद्याप सरकारला सादर झालेला नाही. चौकशी अजूनही सुरू आहे. ही चौकशी जलदगतीने पूर्ण केली. आता पीडितेच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार देखील या प्रकरणात पक्षकार आहे. त्यामुळे सरकार आता न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही करेल. कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे कोणालाही सोडले जाणार नाही, असे कदम यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या आमदारांनी दिशा सालियनचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. ठाकरे गटाचे आमदार राजभवनवर राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी किल्ला लढवत आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. राहुल नार्वेकर यांनी गोंधळातच लक्षवेधी सूचना पुकारल्या. मात्र, सभागृहातील गदारोळ लक्षात घेऊन त्यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
दरम्यान नितेश राणे यांनी सामान्य व्यक्तीला एक कायदा आणि मोठ्या व्यक्तीला वेगळा कायदा असे कसे चालेल असा सवाल करत दिशा सालियन प्रकरणी ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, मंत्री नितेश राणे मंत्री मागणी करत नसतात ती पूर्ण करत असतात मिश्किल टीपण्णी केली.
Marathi e-Batmya