आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरुन महायुती सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या. तर दुसरीकडे विधानसभेतील सभागृहात बळीराजाच्या अपमानावरुन विरोधक आक्रमक होत शेतकऱ्यांच्या अपमान प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसीय निलंबनाची कारवाई केली. नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करतात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावरच बहिष्कार टाकत सभात्याग केला.
बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील वक्तव्य विरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. कृषिमंत्री वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतात. तसेच आमदार आणि माजी भाजप मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह विधान केलं आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेत राज्यातील तमाम शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी माफी मागणी, अशी मागणी केली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अस्लम शेख, ज्योती गायकवाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खुर्चीजवळ पोहोचले होते. मात्र यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार नाना पटोलेंचे एका दिवसासाठी निलंबन केल्यानंतर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत सभात्याग करत संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकला. यावेळी शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी संपूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. यावेळी सभागृहात उपस्थित असलेले मुख्यमंत्री फडणीवस म्हणाले की, पण नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाणे योग्य नाही, म्हणून नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी केली. तर नाना पटोले यांनी राजदंडाला हात लावल्याबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबन केले.
यानंतर विरोधकांनी मोठमोठ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधाऱी पक्षातील सदस्यही समोर आल्यामुळं सभागृहात गदारोळ पाहयला मिळाला. दरम्यान, नाना पटोले यांच्या एक दिवसाच्या निलंबनानंतर विरोधकांनी या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय…माफी मागा…माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा…अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला.
Marathi e-Batmya