जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे वंचित बहुजन आघाडीने ट्विटद्वारे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वारंवार भूमिका मांडत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींसाठी आरक्षण कमकुवत करण्यासाठी खासगीकरणाचा वापर केला. आज जेव्हा ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे, तेव्हा काँग्रेस गप्प आहे. काँग्रेसचे मित्रपक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांची धून वाजवत आहेत.
राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. वंचित बहुजन आघाडी आणि वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे वारंवार मराठा आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मांडताना दिसत आहेत. इतर कोणताही राजकीय पक्ष यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे.
Marathi e-Batmya