प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने कार्यरत १५ जणांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत ते दोषी आढळले असून, त्यांच्याकडून मासिक वेतनाच्या १० टक्के रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात ही माहिती दिली. आ. संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले, सभागृहातील सदस्यांच्या मागणीनुसार, राज्य परिवहन महामंडळामार्फत या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय होता. याची दखल घेत विशेष लेखापरीक्षण पथकाने तपासणी केली. या तपासणीत खरेदी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक अनियमितता आढळली. दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. सध्या दोषी आढळलेल्या १५ कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वेतनाच्या १० टक्के रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मात्र, सभागृहातील सदस्यांनी या कारवाईला अपुरे ठरवत अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली. त्यानुसार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *