राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. आता पुन्हा एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सुपुर्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील घोषणाही एसटी महामंडळाने केली.
माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळाच्या अधअयक्ष पदी स्वतंत्र पणे नियुक्त करण्याऐवजी ते पद राज्याच्या परिवहन मंत्र्याकडेच असावे असा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यासंदर्भातील कायदाही त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने मंजूरही करण्यात आला. असे असताना मागील काही काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या कायद्यातील तरतूदींपेक्षा वेगळी भूमिका घेत अध्यक्ष पदी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. मात्र चार महिन्याच्या काळानंतर का होईना अखेर राज्य सरकारने आपली चूक सुधारत एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.
सन. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणारं आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची ” लोकवाहिनी ” असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले.
Marathi e-Batmya