प्रताप सरनाईक यांची माहिती, येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रॉ प्रताप सरनाईक यांनी केले.

प्रताप सरनाईक या अनुषंगाने मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला छ.संभाजीनगर विभागाचे विभागिय आयुक्त जितेंद्र पापळकर,आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्या सह  धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी वृंद उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठां पैकी श्री. तुळजाभवानी देवी,  तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्रीक्षेत्र तुळजापूरला  भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर  आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही गोष्टी समांतर पातळीवर करण्यात याव्यात अशा सूचना यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना श्री. तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री व  तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले.  याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धी साठी द्यावयाची पत्रे , परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत ,असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *