Breaking News

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, …तुमचं सरकार आल्यावर २०० ते २२५ विधानसभेच्या जागा लढविणार

आगामी विधानसभा नजरेसमोर ठेवत जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी निवडणूकांची तयारी सुरु केली आहे. त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे मागे राहिले नाहीत. सध्या ते विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहिर केले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, दिवाळी नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी इथे आलो आहे. महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार असल्याचे सांगत पण आमच्यासाठी वातावरण सकारात्मक असल्याचा दावा केला.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपाच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपाच्या विरोधात मतदान केलं. लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदारांशी सत्ताधाऱ्यांनी जशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की असेही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं असल्याची टीका करत म्हणाले बदलापूर प्रकरणावरून शपथा बिपथा काय देताय तुमचं सरकार आल्यावर ते सगळं करा अशी उपरोधिक टीकाही यावेळी आजच्या निदर्शनावर केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देणार असल्याचे सांगितले.

लाडकी बहिण योजनेवरून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात असे सांगत महायुतीच्या नेत्यांना इशारा देत म्हणाले की, मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत.

बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? असा सवाल करत महिलांवरचे अत्याचार फक्त महायुतीच्या काळातच नव्हे तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत असल्याचे सांगितले.

मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे काय करेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

शेवटी राज ठाकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार असल्याचेही यावेळी जाहिर केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *