महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ९९ लाख मतदार कसे वाढले आणि भाजपाला सर्वाधिक जागा कशा मिळाल्या यावरून शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. निवडणूक आयोगाच्या या कारभाराच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि मनसेच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबर कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद रानडे आदीजण सहभागी झाले.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७,२९,४५६ पैकी ६२,३७० दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७,१२,२४२ पैकी १,०२,००२ दुबार मतदार आहेत. हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे. त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे असे सांगत राज ठाकरे यांनी मतदार याद्यांचे गठ्ठेच लोकांना दाखवले. त्यामुळे माझे सर्वांना आवाहन आहे की, प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातील घरोघरी फिरा, प्रत्येकाची तोंड ओळख करून घ्या आणि जे दुबार मतदार मतदान केंद्रावर आले तर त्यांना चांगलेच फटकावा आणि मगच पोलिसांच्या ताब्यात द्या असे आवाहनही यावेळी केले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मागील पाच वर्षात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका झालेल्या नाहीत. अन आता निवडणूका घ्या असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे मग मागील पाच वर्षात निवडणूका झालेल्या नाहीत तर आणखी एखादा वर्ष निवडणूक नाही झाली तर काय फरक पडणार आहे. त्यामुळे आधी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील दुरूस्त्या कराव्यात आणि मगच निवडणूका घ्याव्यात अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आजचा मोर्चा हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा आणि हा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षासह सर्वांना मतदारयादी विषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कुणासाठी कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात असेही यावेळी सांगितले.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील. हा फार मोठा विषय नाही, साधी गोष्ट आहे, मतदार यादी साफ करून पारदर्शक करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या. ईव्हीएम EVM मध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय. २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता, कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती असा आरोपही यावेळी केला.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदारयादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदार यादीत घुसवली आहेत त्यांचं काय? मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya