राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले.

टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे सांगितले.

शिवसेना मनसे युतीला शुभेच्छा..

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, त्यांच्या युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही सांगितले.

नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ४१ नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ४१ आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *