मनसेचे राज ठाकरे उत्तम व्यवस्थापन करणारे नेते आहेत. त्यांनी माझ्याबद्दल उपहासात्मक बोलू नये. माझे पक्ष संघटन जरी छोटे असले तरी माझ्याकडे इमानदार कार्यकर्ते आहेत. राज यांच्या भाषणाला सभेला लोक गर्दी करतात, मात्र गर्दी जमवणारे नेते मतं मिळवीत नसतात, अशा बोचऱ्या शब्दात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, अमित ठाकरे यांच्या लग्नाला मी उपस्थित होतो. म्हणून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणार नाही. माहिम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांनाच आमचा पाठिंबा असल्याचेही यावेळी सांगितले.
गरवारे क्लब येथे बुधवारी पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळे मानखुर्द येथील शिवाजीनगर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर केले.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मागील अडिज वर्षात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळालेला नाही. राज्यात पुन्हा आमचे सरकार सत्तेवर येईल. त्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा निश्चित मिळेल. रिपाइंला एक मंत्रिपद आणि विधानपरिषद तसेच ४ महामंडळाची अध्यक्षपदे, ६० सदस्य पदे हवी आहेत. पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद हवे असे अशी मागणीही यावेळी केली.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्री पद देणार यावर आमचा अजिबात विश्वास नाही. मागच्यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराच्यावेळी मंत्री पद देणार असे सांगितले होते. मात्र शिंदे यांच्या नंतर अजित पवार मंत्रीमंडळात आले पण आमचा विचार केला नाही याची आठवणही यावेळी करून दिली.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मनोज जरांगे यांनी चांगला निर्णय घेतला. केवळ एका समाजाच्या मतावर उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे जरांगे पाटील यांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय महायुतीसाठी सुकर आहे. रिपब्लिकन पक्षाची भूमिका महायुतीला समर्थन देणारी आहे. परंतु महायुतीसोबत असताना भाजपाने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते भुपेश थुलकर यांनी राजीनामा दिला. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातून रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावर आठवले यांनी कोणी पक्ष सोडून जाणार नाही. थुलकर सुद्धा आमच्या सोबतच राहतील असे यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya