संजय निरूपम यांची स्पष्टोक्ती, वक्फ आणि मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न चुकीचा विचारांपासून दूर गेलाला उबाठा पक्षच कृत्रिम झालाय

बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा गटच आर्टिफिशिअल झाला आहे. कारण त्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडले होते, अशी टीका केली.

संजय निरूपम पुढे म्हणाले की, काँग्रेससोबत कधीही जाणार नाही आणि गेलो तर शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते, मात्र उबाठाने खुर्चीसाठी काँग्रेसशी घरोबा केला. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांपासून तुम्ही दूर गेला आहात म्हणून तुम्हाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन बाळासाहेबांचे भाषण दाखवावे लागत आहेत, असा टोला निरुपम यांनी उबाठाला लगावला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करणारे उबाठा पश्चिम बंगालमध्ये हिंदुवर अत्याचार करणाऱ्यांसोबत आहेत, त्यामुळेच ते ममता बॅनर्जीचा निषेध करत नाहीत, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना संजय निरूपम म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्यावर न्यायालयाने मनाई केली आहे असे मानणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने मंदिर ट्रस्टमध्ये इतर धर्मीयांना सदस्य करणार का, असा प्रश्न विचारला आहे, मात्र हा प्रश्न चुकीचा आहे. कारण वक्फ बोर्ड आणि मंदिर यांच्यात कोणताही संबंध नाही. वक्फ बोर्ड ही एक बिगर धार्मिक संस्था आहे तर मंदीर ट्रस्ट ही एक धार्मिक संस्था असून त्यात फक्त हिंदू सदस्य असतात, असेही सांगितले.

संजय निरूपम पुढे बोलताना म्हणाले की, वक्फ बोर्ड कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा कोणताही उद्देश नाही. वक्फ हे बिगर धार्मिक संस्था असून त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून फंडिंग दिले जाते. त्यामुळे सर्वोच्च न्यायायल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे यावेळी सांगितले.

हिंदी भाषा सक्तीबाबत संजय निरूपम म्हणाले की नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सन्मान होणे आवश्यक आहे. या धोरणामुळे मराठी मुले मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पारंगत होतील. त्यामुळे इंग्रजी भाषेच्या सक्तीवर आक्षेप न घेणारे हिंदीवर आक्षेप घेत आहेत, हे एक राजकीय ढोंग आहे, अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *