मुंबईः विशेष प्रतिनिधी
देशाच्या पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला भेटीप्रकरणी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी टीकेची झोड उठवत अशी वक्तव्ये खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारून याप्रकरणी उत्तर देण्याची मागणी केली.
शिवसेना प्रवक्ते राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या भेट घेत असत. तसेच निवडणूकीत त्यांचा वापर करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गंभीर दखल घेत आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. स्व. इंदिराजी गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचे सांगत
करीम लाला, हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या अशी आठवण सांगितली.
तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अशा पध्दतीची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा संजय राऊत यांच्यासह शिवसेनेला दिला.
त्यावर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे की खोटे याचा उलघडा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनीच करावा अशी मागणी करत काँग्रेसने किमान सत्य स्विकारायला हरकत नसावी असा उपरोधिक टोलाही लगावला.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेची थोरात यांनी दखल घेत मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये असा टोला लगावला.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवित शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो. माझ्याजवळ राऊत फिरकायचा देखील नाही. राऊत यांना सत्तेचा माज चढला असून त्यामुळेच त्यांची जीभ जास्त चालायला लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्वतःच्या भावाला मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. छत्रपतींच्या वशंजाबद्दल काय बोललात तर जीभ जागेवर राहणार नाही, असा इशाराही दिला.
Marathi e-Batmya