राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता १५ हजार वरून ५० हजार पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.
याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या संदर्भात समितीचा अहवाल प्रलंबित असून तो प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. २०२५-२६ वर्षासाठी या योजनेसाठी ७.१५ कोटींची तरतूद करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे.
शेवटी संजय शिरसाट म्हणाले की, राज्यातील काही शाळांकडून प्रस्ताव प्रलंबित असून काही ठिकाणी भत्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे. भत्ता वाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya