बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात सामाजिक आणि राजकिय स्तरावर चांगलेच उमटायला लागले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबिंयाबरोबर सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी पुणे पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी अद्यापही फरार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये आयोजित सर्वपक्षिय मोर्चाही काढण्यात आला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी महिना झाला तरी अद्याप आरोपींना अटक नाही. मग न्याय मिळणार कधी असा सवाल पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारला केला.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी म्हणून ज्या वाल्मिक कराड यांच्यावर संशय व्यक्त केला जातो, त्या वाल्मिक कराडने ३१ डिसेंबर रोजी पुणे सीआयडीसमोर शरणागती पत्करली. त्यास न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. दरम्यान वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुण्यात संतोष देशमुख त्यापप्रकरणी आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख हे सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही जनआक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो आहोत. सरकार न्याय कोणत्या पद्धतीने देणार हा सरकारचा प्रश्न आहे. आमची मागणी एकच आहे की मला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची लवकरच भेट घेणार आहे. त्यांच्याकडे आम्ही काय मागणी केली याची माहिती नंतर माध्यमांना दिली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाले की, आमची मागणी हीच आहे की आम्हाला नियाय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना झाला तरी आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार असा सवाल करत माझी प्रशासनाला विनंती आहे की, जे कुणीही आरोपींची मदत करत असतील त्यांना या प्रकरणात सहआरोपी केलं पाहिजे. आम्ही आजही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय द्या हीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यांनी आम्हाला सांगितलंय की न्याय मिळवून देऊ, हा न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya