राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. त्यात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार असल्याची अधिकृत घोषणा नसली तरी अप्रत्यक्ष घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना आव्हान देत तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहिर करा असे आव्हान दिले.
त्यानंतर आज सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांचे नाव सभेच्या सुरुवातीलाच घेत ज्यांना महाराष्ट्र सांभाळण्याची दृष्टी आणि शक्ती असलेले जयंत पाटील असा नामोल्लेख करत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून संकेत दिले. त्यावरून महाविकास आघाडीत विशेषतः शिवसेनेच्या गोटात चलबिचल निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांनी दिलेल्या संकेतामुळे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचेच नाव अंतिम करण्यात आल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झालेले असतानाच संजय राऊत यांनी मात्र सावध पवित्रा घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना संजय राऊत बोलताना म्हणाले की, आम्ही यापूर्वीच महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करावा असे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणाल्याचे स्पष्ट करत आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका जाहिर केल्याची आठवण करून दिली. तसेच यापूर्वीच आम्ही त्याबाबत स्पष्ट बोललो आहोत. मात्र आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करत राज्याच्या मनामनात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे. शरद पवार यांनी यापूर्वी रोहित पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपविली असून मध्यंतरी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादीत सुरु होती. त्यामुळे निवडणूकीचा निकाल आल्यानंतर त्याबाबत बोलू असे सांगितले.
दरम्यान महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल अशी विचारणा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून यापुर्वी शरद पवार आणि नाना पटोले यांना करण्यात आली असता निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईल असे सांगत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत मौन बाळगले होते. त्यानंतर आता अचानक शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या नावाचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीबाबतच काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय काँग्रेसकडून सध्याच्या कालावधीत नाना पटोले यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येत असून यावेळी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून मुख्यमंत्री पदासाठी पक्षाच्या स्तरावर आणि राजकिय वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी तीन तीन नावे जाहिर करण्यात येत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याच्या नावावरून त्यांच्या डोक्यात शिजतय, सध्या शरद पवार यांच्या डोक्यात तीन नावे आहेत. मात्र त्या नावांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याचे सांगत आपला राजकिय अंदाज वर्तविला. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात विविध तर्क वितर्क लढविले जात असून शरद पवार यांचे आणि भाजपाचे धक्कातंत्र देण्याची पद्धत एकसारखीच असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
Marathi e-Batmya