अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण पार पाडत आहे. संपूर्ण कुटुंब एक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राजकारणात परिपक्वता असावी लागते, ही त्यांच्या पक्षाची स्थिती आहे, हा निष्कर्ष त्यांचा पक्ष काढत आहे. त्यामुळे तेच स्पष्टीकरण देतील, आमचा उमेदवार निवडणूक लढवत नाही. मग प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठे ,असेही यावेळी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले की, विलिनिकरणाची चर्चा ही आमच्याकडून जयंत पाटील करत होते. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात ही चर्चा सुरू होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली. आता कुठली ही चर्चा सुरू नाही. शिवाय पक्षात ही विलिनिकरणाची कोणती ही चर्चा झालेली नाही. पुढे काय होईल हे आताच सांगता येत नाही, असेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडून विलिनीकरणाबाबत अजितदादांसोबत पाच-सहा बैठकाही झाल्या होत्या. त्या बैठकीनंतर दोघांपैकी एक जण येऊन मला माहिती देत असे. भविष्यात ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल की नाही, हे आताच सांगता येत नाही, असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की,एखाद्या मतदारसंघात राजकीय पक्षाने भूमिका घेतली तर हा राजकीय विषय नाही. राज्याचा विषय नाही, कुणीही उमेदवार देणं चुकीचं आहे असं नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. निवडणूक लढणे हे राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. शिवाय निवडणूक बिनविरोध झाली पाहीजे ही मागणी करण्याचं ही काम नाही, निवडणूक होणार आहे हे समजूनच निवडणूक लढायची असते, त्याची तयारी करणे गरजेचे असते, असेही सांगितले.
Marathi e-Batmya