राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी खोचक टोला लगावत कोणी मुर्खासारख बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची असे वक्तव्य केले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.
मनसे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असल्याचा आरोप केला. तसेच शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप करत पुण्यातील एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी काढून त्याऐवजी फुल्यांची पगडी डोक्यावर घालायला दिली. तसेच पुणेरी पगडीऐवजी फुले यांची पगडी वापरत जा असा सल्लाही यावेळी दिला. हे उदाहरण देत हा एकप्रकारे जातीयवाद असल्याचा आरोप नुकतेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला होता. तसेच केलेल्या कामाचे एक पुस्तक शरद पवार यांना पाठवून देणार असल्याचेही सांगितले होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता म्हणाले की, कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी असा खोचक टोलाही यावेळी राज ठाकरे यांना लगावला.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, जातीयवाद मी केला असेल तर एक तरी उदाहरण मला दाखवा. माझ्या नेतृत्वाखाली जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होतं, त्यावेळचे निर्णय बघा, आम्ही कोणाला प्रोत्साहन दिलं. त्यावेळी पक्षाच्या विधिमंडळात नेतृत्व करण्यासाठी कोणाला संधी दिली ते बघा. मधुकर पिचड यांना नेता बनविलं, छगन भुजबळ यांना नेता बनवलं. मी २५ लोकांची यादी देऊ शकेन जे विविध जाती-जमातीचे लोकं होते. आदीवासी, दलित, ओबीसी, सगळ्यांची नेमणूक केली आहे. आमची भूमिका व्यापक होती. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत, त्याला आधार काय मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचं. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर ती लोकांना वाटतं काहीतरी असावं बाबा. त्यामुळेच राज ठाकरे आरोप करत असावेत असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाल की, पुणेरी पगडी बाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुले यांच्याबाबतचा होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुले यांची पगडी मलाही घालण्यात आली. मी जरी म्हटलं की ही टोपी घाला, फुले पगडी वापरा त्याचा आनंद असेल तर मी जातीयवादी कसा असा सवाल करत महात्मा फुले यांनी कधीही जातीयवाद केला नाही. आमच्यासाठी महात्मा फुले त्यांचा विचार, आम्ही अंगीकारतो, लगेच आम्हाला जातीयवाद कस काय म्हणायचं याला फारसा अर्थ नाही असेही यावेळी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांच्या आरोपावर बोलताना शरद पवार म्हणाले की, शरद पवार यांनीच शिवसेना पक्ष फोडला असा आरोप छगन भुजबळ करतायत. मी कुठल्या पक्षात होतो असा सवाल करत मी काही शिवसेनेत नव्हतो. माझी जबाबदारी काय आमच्या पक्षाला ताकद देणार की विरोधकांना ताकद देणार कमकुवत करणार जर कामकाज करायचं असेल तर असे आघात होतातच असे सांगत छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी अस्वस्थ आहेत. ते संपर्क साधू इच्छितात तेव्हा आम्ही संपर्क साधला त्यात काहीही चूक नसल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya