काँग्रेस म्हणते, …तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात जाणार शिवसेना संपवण्याच्या राजकारणात भाजपा बंडखोरांचाही वापर करुन त्यांना सोडून देणार

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज खंडपीठाकडे सोपवला असला तरी कायदेशीरबाबींचा विचारविमर्श करता न्यायालयाचा निकाल हा सरकारच्या विरोधात जाऊ शकतो. मुळात राज्यातील भाजपा प्रणित सरकार हे असंवैधानिक असून या सरकार स्थापनेसंदर्भात आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णयही असंवैधानिकच आहेत, असे परखड मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडले आहे.

यासंदर्भात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय खंडपीठाकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दोन तीन गोष्टी स्पष्ट होतील. पहिला म्हणजे विधानसभेच्या उपसभापतींनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का? राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रकरणात पहिली यादी हीच ग्राह्य धरावी असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे नंतरची सर्वच प्रक्रिया जसे की राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणे, राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला संमती देणे, या सर्व घटना घटनात्मकदृष्ट्या योग्य होत्या की नाही याचा निर्णय लागणार आहे. हा निर्णय विरोधात जाण्याचीच जास्त शक्यता आहे असे घटनातज्ञांचे मत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने शिवसेनेतील ४० बंडखोर आमदार व भाजपाप्रणित सरकारचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. पण हे सरकार जास्त काळ राहू शकणार नाही. शिवसेना आपल्याच हातात येईल असा भोळ्याभाबड्या शिवसेना आमदारांचा जो समज झाला आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की भाजपा त्यांनासुद्धा ‘वापरा व सोडून द्या’ या तत्वानुसार राजकीय उद्देश साध्य होताच त्यांनाही सोडूनच देणार आहे. भाजपाने देशात अघोषीत आणीबाणी लावली असून लोकशाही धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *