स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक २२ ते २६ जुलै या कालावधीत ‘जनसेवा सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
आदरणीय अजितदादा म्हणजे अथक परिश्रम… दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व… निर्णयक्षमता आणि जनतेसाठी अखंड झटणारे नेते… शेतकरी…कष्टकरी… महिला… युवक… विद्यार्थी यांना त्यांचा आधार होता… कृषी… सहकार… अर्थ… उद्योग… आरोग्य… शिक्षण… क्रीडा… पर्यावरण… पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास अशा प्रत्येक क्षेत्रात दादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अथक प्रयत्न केले आहे.
जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने खालील उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये
पर्यावरण संवर्धन विषयक उपक्रम
आदरणीय दादांनी नेहमीच वृक्ष व पर्यावरण संवर्धनावर भर दिला होता. त्यामुळे प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, आणि शाळा महाविद्यालये यामध्ये ‘हरित महाराष्ट्र,वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली,’ ‘दादांची दृष्टी, हरित सृष्टी,’ अशा थीम अंतर्गत वृक्षारोपण मोहिम घेतली जाणार आहे. अजितदादांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री देवराई फाऊंडेशन या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात ‘देवगिरी ते देवराई’ हा वृक्षसंवर्धन उपक्रम राबवला जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद आजी – माजी सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात प्रत्येकी एक देवगिरी ते देवराई उभारावी.
आरोग्य विषयक उपक्रम –
राज्यव्यापी रक्तदान शिबीरे आयोजित करुन रक्तदान जनजागृती व रक्तसाठा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न. ग्रामीण व शहरी भागात मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिरे, त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि डोळ्यांच्या तपासणी केल्या जाणार आहेत. महिलांसाठी स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग तपासणी आणि सर्वांसाठी मुख कर्करोग तपासणी व समुपदेशन करावे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑस्टीओपोरोसिसचे निदान शिबीरे आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रम
अजितदादा शिस्तप्रिय व स्वच्छतेचे भोक्ते होते. यामुळेच या जनसेवा सप्ताहात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गडकिल्ले, महापुरूषांची स्मारके, स्थळे, एसटी बस स्थानक आदी तर वारीसोबतच्या अजितदादांच्या स्मृती वारकऱ्यांच्याप्रती चिरंतन रहाव्यात यासाठी आषाढी वारीमध्ये वारकरी सेवा उपक्रम राबविला जाणार आहे.
महिला सक्षमीकरण विषयक उपक्रम-
दादांच्या सामाजिक समावेशकतेच्या विचारधारेला प्रोत्साहन देणारे महिलांसाठी राज्यस्तरीय मेळावे, यामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि स्वयंरोजगार यावर चर्चा, संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम, महिलांना सूक्ष्म कर्ज, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वासाठी मार्गदर्शन, पक्षाच्या महिला आघाडी मार्फत अजितदादा महिला सशक्तिकरण पुरस्कार दिला जाणार आहे. शिवाय शेतकरी महिला सन्मानही केला जाणार आहे.
कृषी विषयक उपक्रम-
जगातील नवीन व सर्वोत्तम तंत्रज्ञानाबाबत दादा माहिती घेऊन त्याचे प्रयोग शेतीत करायचे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ चा वापर करावा हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एआय तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, कृषी प्रदर्शने, शेतकरी समुपदेशन मेळावे, पीक पध्दती आणि बाजारभाव मार्गदर्शन व फलोत्पादन आणि फुलशेतीबाबत कार्यक्रम, प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी महिला व पुरुष यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार देण्यात यावा.
युवा संकल्प शिबिर-
अजितदादांच्या सामाजिक विचारधारेवर पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये युवा शिबिरे घेतली जाणार आहेत. शिवाय प्रमुख नेत्यांचा नेतृत्वाखाली कार्यशाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युवांना प्रशिक्षण त्यामध्ये नेतृत्व कौशल्य, प्रचार रणनीती आणि मतदारांशी संवाद आदीचा समावेश असणार आहे. याशिवाय विविध क्रिडा प्रकारात नामांकित व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आजी-माजी खेळाडूंचा क्रीडा सन्मानाने गौरव व विविध खेळांचे आयोजन केले जाणार आहे.
अल्पसंख्याक सेवा संकल्प –
अजितदादांनी अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना आणि उपक्रम हाती घेतले होते अशा अनेक योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजाला मिळावा यासाठी सेवा संकल्प शिबिरे आयोजित केली जाणार आहे.
या जनसेवा सप्ताहाची जबाबदारी पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांनी त्या- त्या ठिकाणी जाऊन जिल्हाध्यक्ष, फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, तालुका व शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घ्यायच्या आहेत असेही खासदार सुनिल तटकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Marathi e-Batmya