राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख कुटुंबियांना आणि महादेव मुंडे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहे. आता हा लढा मी लढणार असून, देशमुख आणि मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी देशमुख आणि मुंडे कुटुंबियांसह ग्रामस्थांना दिला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, आपल्या देशात खंडणी मागणे गुन्हा आहे. वाल्मिक कराड खंडणी मागत होता, तर त्याला आधी अटक का झाली नाही? त्यांना ईडी का नाही लागली? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागितली, तेव्हाच त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई व्हायला पाहिजे होती. बीड जिल्ह्यात लोकांना वर्दीची भीतीच राहिली नाही. बीडची बदनामी करायचे पाप या पाच दहा लोकांनी केले. तुम्ही सगळे सुसंस्कृत आणि चांगलेच आहात. तुम्ही सुसंस्कृत असल्यामुळेच ते तुम्हाला दम देतात. आता महिलांनी लढाई हातात घेतली पाहिजे, समोर कोणी आले तर घ्या हातात लाटणे आणि ठोकून काढा, असा मी आग्रह करते, असे आवाहनही यावेळी केले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, संतोष देशमुख प्रकरणात आम्हाला एक दिवस अपडेट पाहिजे, अशी मी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करणार आहे. तुमचे प्रशासन काय काम करतंय याची माहिती मिळाली पाहिजे. लपवण्यासारखे काही नाही, तर मग तुम्ही राज्याला का सांगत नाहीत? वाल्मिक कराडची व्हिडिओ काढून मी पोलिस स्टेशनला येतोय, असे सांगण्याची हिंमत कशी होते? कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे. कृष्णा आंधळे आहे कुठे? असा हवेत गायब झाला का? रोज आमचे फोन ट्रॅक करता, तर तो कृष्णा आंधळेला ट्रॅक करता येत नाही का? असा संतप्त सवालही यावेळी सरकारला करत कृष्णा आंधळे आणि सर्व आरोपींचा सीडीआर मिळालाच पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील यांची सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही. हा लढा सत्यानेच लढूया. आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत, ताकदीने लढू. कोर्ट केसेस वगैरे सर्व मी स्वतः बघेल. तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काही दिवसांपूर्वी एकाचे डोके फोडले त्यालाही आपण न्याय मिळवून देऊ. बीडमधील गुंडगिरी कुठेतरी थांबली पाहिजे, ग्रामस्थांनी आंदोलन करू नये, तुमची लढाई आम्ही लढणार, अशी ग्वाहीही यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केली.
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की,बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी संसदेतही आवाज उठवला होता. बजरंग सोनावणे आणि मी आठ दिवसांपूर्वी आम्ही अमित शाह यांना भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, ते या विषयात जातीने लक्ष घालतील. आम्ही दोघांनी याचे फोटो टाकले नाहीत, काही बोललो नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने गृहमंत्र्यांना विनंती केली. यामध्ये पोलीस किंवा अधिकारी कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय करु नका. मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते, मी कोणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. जो कोणी याच्यामागे आहे, त्याला फाशी झाली पाहिजे. महाराष्ट्राने तुम्हाला इतके मोठे मतदान केलंय, न्याय मिळणार नसेल तर काय करायची सत्ता, असा उपरोधिक सवालही यावेळी केला.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, आज महाराष्ट्रात आपण माणुसकी विसरलोय का? हा प्रश्न माझ्या मनात येतो. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे टोकाचे मतभेद आहेत. पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती. देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेतृत्व आहे. देशमुख कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोलले असेल, तेव्हा तुम्हाला आठ दिवसांतच न्याय मिळेल, अशी माझीही अपेक्षा होती. राजकारण तर सुरूच राहील, हे राज्य आता मी चालवतो आणि राज्यात असली कुठलीही कृती सहन करणार नाही, असा एक संदेश द्यायला पाहिजे होता. मी आज खासदार म्हणून नाही, तर महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. माझा पदर पुढे करून या भावासाठी न्याय मागणार असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संतोष देशमुख यांची हत्या हा राजकारणाचा विषय नाही. महाराष्ट्राचा एक लेक आपण गमावला आहे. त्यामुळे या विषयात राजकारण म्हणून कुणीही पडू नये. माणुसकीच्या नात्याने कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. आपले अधिकार दिले. असे असतानाही देशमुख कुटुंबाला ७० दिवस झाले, तरी न्याय मिळत नाहीये असा जाब विचारत म्हणाल्या की, मागील आठ-दहा दिवसांत झालेल्या घटना अस्वस्थ करणाऱ्या होत्या. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने हा लढा मी लढणार असल्याचा शब्दही यावेळी दिला.
सुप्रिया सुळे यांनी परळी येथे मुंडे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बांध फुटला. मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी यांनी आपबीती कथन करून न्याय मिळत नाही. माझ्या पतीचा कोणासोबत वाद नव्हता, त्यांची हत्या का झाली? कोणी केली? याची काहीच माहिती पोलिस देत नाहीत. आता १५ महिन्यांच्या नंतरही तपासात काहीच हाती लागले नसल्याची खंत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांना फोनवरून संपर्क करून तपासातील प्रगतीची माहिती जाणून घेत आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली. तसेच महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी अशी सूचनाही यावेळी केली.
Marathi e-Batmya