देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, प्रदेश चिटणीस भालचंद्र शिरोळे, प्रदेश सचिव निलेश भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस सचिन नारकर, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा प्रियाताई बांदीवडेकर, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, विधानसभा उमेदवार फहाद अहमद, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके, सेवा दलचे गिरीश सावंत, भगवान पवार, मुबारक खान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,आजपासून पूर्ण वर्षभर प्रजासत्ताकाचे वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करणार असून गाव, वाडी, वस्ती, शाळा आणि महाविद्यालयपर्यंत जाऊन संविधानाचे महत्त्व आणि संविधानाचे मूल्य रुजवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असे असल्याचेही यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्या वर्षात आपल्या उदात्त संविधानाची पंच्याहत्तरी साजरी करावी, जगभर अभिमानाने मिरवावी त्या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान वाचविण्यासाठी, जपण्यासाठी लढावं लागत असलं तरी मानवतेची मूल्य देशात रुजविणाऱ्या, शतकांची गुलामी झुगारून लावणाऱ्या ‘भारतीय संविधाना’ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व भारतीयांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात उत्तम संविधान आपल्याला दिले आहे. संविधान समितीने जगाला एक व्यापक विचार दिलेला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संघर्षाची वेळ येते त्या संघर्षावर कशाप्रकारे मात करायची हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले आहे. मागील वर्षी सत्तेतील अनेक जबाबदार लोकांनी संविधानविरोधी वक्तव्य केली. सत्ताधाऱ्यांच्या त्या विरोधाला आपण सर्वांनी मिळून विरोध केला. संविधान बदलण्याची भाषा देशातील प्रत्येक नागरिकांनी हाणून पाडली. त्यामुळेच आता संविधान बदलण्याची भाषा कोणीही करणार नाही असेही यावेळी सांगितले.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिन आज साजरा होत आहे. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला त्यांची आठवण आपण काढली पाहिजे. आम्ही सत्तेत परत आलो तर संविधान बदलू ही भाषा तुम्हा जनतेच्या ताकदीमुळे बदलली. ही ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या एका मतामुळे मिळालीये. भारतीय संविधानाच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भारतातील जनता मान्य करणार नाही असेही सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आपण लढलं पाहिजे. हा देश लोकशाही पद्धतीनेच चालणार, इथे दडपशाहीला आम्ही थारा देणार नसल्याचेही सांगितले.
Marathi e-Batmya