रामदास कदमांची भास्कर जाधवांवर शिवराळ भाषेत टीका तर अंबादास दानवेंना थेट धमकीच उत्तर सभेआधीच रामदास कदमांची ठाकरे गटावर टीका

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, रामदास कदम, उदय सामंत यांच्यावर खोचक टीकाही केली. या टीकेला प्रत्युत्तर याच गोळीबार मैदानावर देणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहिर केले. तत्पूर्वीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना थेट धमकीच दिली.

या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही या सभेला विरोध करत शिंदे गटावर टोलेबाजी करताना म्हणाले, सभा कशाला घेत आहात. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर बोलायला पाहिजे, असा सल्ला भास्कर जाधवांनी दिला.

यावरून भास्कर जाधवांना उद्देशून रामदास कदम म्हणाले, अरे अजून सभाच झाली नाही. तर कशावर बोललं पाहिजे? हे तुम्ही कसं काय ठरवू शकता. आधी सभा तरी होऊ द्या. मग कोण कशावर बोललं, हे तुम्हाला कळेल. भास्कर जाधव हा नुसता कुत्र्यासारखा भुंकतोय. त्याच्याकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. त्याचा तोल गेला आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी स्वत: आता भास्कर जाधवांच्या मतदारसंघात लक्ष घातलं आहे. माझ्याकडे दोन वर्षे आहेत. आता मी त्याला गाडणारच आहे, हे त्याला कळालं आहे. त्यामुळे तो कुत्र्यासारखा बेफाम भुंकतोय. मी त्याच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही, अशा शिवराळ भाषेत टीका केली.

यावेळी बोलताना रामदास कदम म्हणाले, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुढच्या निवडणुकीत थांबलं पाहिजे, असा माझा विचार आहे. भास्कर जाधवांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारलं असता रामदास कदम म्हणाले, अरे तू थांबलास किंवा थांबला नाहीस… तरीही मी तुला गाडणारच आहे. कारण तुझी औकात नाही. तुझी लायकी नाही. तू नीच आहेस. तू महानीच आहेस. तुझा मेंदू सडलेला आहे. तू वाटेल ते बडबडतो. तुला उपकाराची अजिबात जाणीव नाही. ज्या थाळीमध्ये खातोस तिथेच तू छेद करतो. असा तू नालायक माणूस आहेस. त्यामुळे पुन्हा तुला विधिमंडळात जाण्याचा नैतिक अधिकारही नाही. तुला मी गाडणार एवढं १०० टक्के नक्की असल्याचा इशाराही दिला.

यावेळी अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना रामदास कदम यांनी दानवेंना थेट धमकीच देत म्हणाले, अरे तुला एकनाथ शिंदे आणि आम्ही विधान परिषदेवर निवडणूक आणले. त्याची तरी जाण ठेव. खबरदार माझ्या विरोधात बोलशील तर याद राख असा दम भरत दानवेंची लपडी बाहेर काढली तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा इशारा दिला. तसेच तो एहसान फरामोश, नीच माणूस असल्याची टीकाही केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *