जयंत पाटील यांचा टोला, भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला सवय… मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र बदलतय

महाविकास आघाडीची पहिलीच सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या सभेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही पक्षांचे लाखो कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून या सभेला ‘वज्रमूठ’ असं नाव देण्यात आलं आहे. पण मविआची हीच वज्रमूठ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या काळात जशीच्या तशी राहील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महाविकास आघाडी पुढच्या काळात राहील का? हे प्रश्न आता अनावश्यक आहेत. कारण आम्ही एकत्रित येवून लोकांसमोर जातोय. या आमच्या कार्यक्रमानंतर आणि महाराष्ट्रात प्रत्येक विभागात होणाऱ्या विविध कार्यक्रमांनंतर मला खात्री आहे की, भाजपाचा धीर खचल्याशिवाय राहणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपा आणि शिवसेने (शिंदे गट) ला सवय आहे, ज्यावेळी विरोधी पक्ष एकसंघाने कार्यक्रम करतात त्यावेळी वेगळा उपक्रम राबवून मीडिया डायवर्ट करण्याचं काम ते प्रत्येक वेळेला करतात. आताही तेच काम असेल, अशी उपरोधिक टीकाही केली.

तसेच जयंत पाटील म्हणाले, मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बदललं आहे. मराठवाड्यात आज जे चित्र दिसेल ते महाराष्ट्रातील सगळ्या भागांची मानसिकता असेल. महाविकास आघाडीची वज्रमूठ म्हणून जी सभा होतेय त्यापासून मीडियाच्या माध्यमातून लोकांचं लक्ष विचलित व्हावं यासाठी भाजपा आणि शिवसेने (शिंदे गट) कडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्याचा टोलाही सत्ताधाऱ्यांना लगावला.

जयंत पाटील यांनी राड्याबाबत बोलताना म्हणाले, मी स्थानिक कार्यकर्ते आणि इथल्या प्रतिष्ठित लोकांशी बोललो. सुरुवातीला जे दंगलखोर लोकं फिरली त्यांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांना अजून अटक केली नाही. ज्या युवकांनी दंगल घडवण्यासाठी काम केलं त्यांना कुणाला अटक केली नाही आणि निष्पाप, ज्यांचा कुणाचा संबंध नाही अशा लोकांना अटक केल्याचा आरोपही केला.

पोलिसांनी पहिल्यांदा स्वत:चं कर्तव्य बजावलं पाहिजे. जे सीसीटीव्हीत दंगल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पकडा. तेच खरे दंगल घडवणारे लोकं आहेत. दंगलीच्या मागे मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधायचं असेल तर घटनेच्या पहिल्या एक-दोन दिवसआधी जे मुलं स्कुटरवरुन फिरताना आणि काही आक्षेपार्ह करताना आढळली त्यांना आधी अटक केली पाहिजे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *