शिक्षक सेनेच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या आजपासून सुरू करा. जसे आरएसएस करते. जिकडे जाते तिथे पोखरायला लागते. आपण वाळवी म्हणता तसे. आधी दिसत नाही, पण नंतर कळते वाळवी लागली आहे. तसे वाळवीसारखे काम करायचे नाही. शिवसेनेचे जे हिंदुत्व आहे, आपले हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसे प्रखार राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचे काम करा. जिथे जिथे शक्य असेल जिथून आला असाल तिथे करा असे आवाहन केले.
दिल्ली विधानसभा निवडणूकीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इतके काम करूनही दुर्दैवाने निवडणुकीचा निकाल लागला. हा खोटा पराभव आहे. हा निकाल मी निकाल म्हणून मानायला तयार नाही. अजिबात नाही. अरविंद केजरीवाल हरले काहींना आनंद झाला. काही जण झोपेतून उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली. काहीजण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि काही झाल्यानंतर कुंभकर्ण सारखे उठतात आणि प्रतिक्रिया देतात. तशी काहींनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या. केजरीवालांनी दिल्लीत शाळांसाठी वीजेसाठी पाण्यासाठी काम केले आहे. जसे इथे शिवसेनेने केले आहे. रक्तदान आहे अॅम्ब्युलन्स असेल इतर गोष्टी असेल ते लोक विसरणार नाहीत. काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहेच असा संशयही यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक कार्यक्रमावेळी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या सर्व तसबिरींना आपण हार घालतो. कारण संपूर्ण समाज एका अंधारात असताना हे महापुरूष झाले नसते तर आपण आज आहोत ते झालो नसतो. महापुरूष गेले कुठे, महापुरूषांचे युग संपले की काय. आज आपल्यात तसा कुणीच दिसत नाही असे सांगत पु ल देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर धरावे असे पाय आणि हार घालावे असे गळे कुठेच दिसत नाहीत. धरावे असे गळे खूप दिसतात (हशा) पण ते धरताच येत नाहीत अशी पंचाईत आहे अशी मिश्कील टीपण्णीही यावेळी केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणीतरी म्हटलेय ज्यावेळेला ठेंगू माणसांच्या…ठेंगू म्हणजे बौद्धिकदृष्ट्या म्हणतोय. शारीरिक नाही. ठेंगू माणसांच्या सावल्या लांब पडू लागल्या की समजायचे सुर्यास्त जवळ आलाय. आज आपला देश सुर्यास्ताच्या दिशेने चाललाय की काय अशी भीती वाटायला लागलीय. कारण कोणता नेमका धर्म आपल्याला अपेक्षित आहे. कोणता देश अपेक्षित आहे. कोणती संस्कृती अपेक्षित आहे. कुणाचा कुणाला पत्ता नाही. एकीकडे कुंभ चालू आहे. लाखो करोडो लोक जाताहेत कुंभात डुबकी मारून येत आहेत. प्रत्येकाच्या भावनांचा आम्हाला आदर आहे. त्याला कुठेही धक्का लागता कामा नये. ज्याला वाटते तिकडे जाऊन डुबक्या माराव्यात आणि पवित्र व्हावे. पंतप्रधानांनीही डुबकी मारली अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.
मला गणपती मंडळांच्या अध्यक्षांचे पत्र आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले की, माघी गणेशोत्सवात आदल्या दिवशी नोटीसा दिल्या की ज्यांनी पीओपीच्या मुर्त्या बनवल्या त्यांनी विसर्जन करायचे नाही. हा काय प्रकार आहे. पंतप्रधान डुबकी मारताहेत आणि गणपतीचे विसर्जन होऊ देत नाहीत. हा काय प्रकार आहे? असा खोचक सवाल करत कोणते हे हिंदुत्व आहे? पीओपीच्या मुर्त्यांनी प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मुर्त्या बनवा. ठीक आहे बनवतो. पण शाडूची माती देणार कोण. पर्याय कोण देणार त्याला. अचानक मुर्ती बनवून तयार झाली, त्याचे आगमन होतेय आणि आदल्या संध्याकाळी गणपती मंडळांना तुम्ही नोटीसा देणार असाल तर मग तुमचे नेमके हिंदुत्व काय. तलावात विसर्जनाला बंदी घातली. काही ठिकाणी विसर्जित केलेल्या मुर्त्या बाहेर काढल्या. कुठे कुठे अशा मुर्त्या नतद्रष्ट सरकार व पालिकेने अडवून ठेवल्या आहेत ते शोधून काढा मग बघू पुढे काय करायचे असा इशाराही यावेळी दिला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन २०२५ | प्रमुख उपस्थिती – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | मुलुंड, मुंबई – #LIVE https://t.co/IyakDakt60
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) February 10, 2025
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. का तुम्ही सदस्य वाह्यचे नाही. झालेच पाहिजे तुम्हाला सदस्य. फावल्या वेळेत तुम्हाला बाकीची कामे सांगत असतील तर फावल्या वेळेत तुम्ही शिवसेनेची सदस्य संख्या वाढवा. आता निवडणुका नाही आहेत, मग फावल्या वेळेत शिवसेनेचा प्रचार बेधडक करा नाहीतर या मागण्या नुसत्या कागदावर राहतील. अभ्यंकर विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत बोलतील पण समोर बहिरे किंवा कान बंद करून बसलेले सत्ताधारी असतील तर उपयोग काय तुमच्या बोलण्याचा? या ताकदीचा तरी काय उपयोग आहे? ही ताकद आता एकवटली आहे या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण सरकारला दाखवत नाही. यावेळेला त्यांनी आपली संधी काळ्या विद्या किंवा अन्य कारस्थाने असतील त्या मार्गाने हिरावून घेतली. कारण आजही जिथे जिथे जातोय तिथे लोक म्हणतात आम्ही तुम्हाला मतदान केले आहे. तुमचा पराभव होऊच शकत नाही असेही यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आज दिशा ठरवा. शिक्षक हा फार महत्वाचा घटक असतो. दहावीत पोहोचलो. मग दर महिन्याला एक परीक्षा असते. तीन महिन्यांनी तशी दहावीत आमची पहिली परीक्षा. गणिताची होती. दीडशे मार्काचा पेपर. मास्तर आले विचारले ठाकरे कोण. मला वाटले चुकून पहिला वगैरे आलो का. माझ्याकडे पेपर देऊन अशा नजरेने बघितले तर खाली दीडशे मधे रेघ आणि वर अकरा. मग म्हटले आपले काही खरे नाही. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडिया नव्हता पण आता पेपरमध्ये येणार. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा नापास. मग क्लास जॉईन केला. चितळे नावाचे शिक्षक होते. दिवाळीच्या वेळी शिकवायला सुरूवात केली. अंतिम परीक्षेत खाली दीडशेच होते, वरती अकराच होते पण त्याच्या आधी एक लागला होता. हे मी कदापि विसरू शकत नाही असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एखादी गोष्ट आपल्याला पटली असेल तरच ती दुसऱ्याला सांगू शकतो. एखाद्या विषयाची आवड नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवणार काय. कंत्राटी कामे बंद होतील तेव्हा ते शक्य आहे. चित्रकाराची वक्त्याची गायकाची शैली असते तशी शिक्षकाचीही शिकवण्याची शैली असते. ती विकसित कधी होईल तन मन धनाने तुम्ही काम कराल तेव्हा. कारण घर चालवायला धनही लागते. सरकारने त्याची चिंता ती परिस्थिती तुमच्यावर येऊ न देणारे सरकार पाहिजे असेल तर हातातली मशाल घेऊनच पुढे जावे लागेल असे आवाहनही यावेळी केली.
Marathi e-Batmya